अतुल कांबळे, TV9 मराठी, मुंबई : सर्वाधिक लोकसंख्या एकटवलेल्या कल्याण आणि ठाण्याच्या प्रवाशांसाठी कळीचा असलेल्या कळवा ते ऐरोली एलिवेटेड लिंकची घोषणा मोदी सरकारने करून सहा वर्षे लोटली आहेत. रेल्वे आणि राज्य सरकारच्या सहभागाने काम करणा-या मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी -3 मध्ये कळवा ते ऐरोली एलिवेटेड मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पासाठीची खाजगी जमिन ताब्यात आल्यावर तीन वर्षांनी हा प्रकल्प मार्गी लागेल असे महामंडळाने म्हटले आहे. सध्या मुख्यमंत्री ठाण्याचे तर त्यांचे पूत्र कल्याण लोकसभा क्षेत्राचे असल्याने लाखो प्रवाशांसाठी फायदेशीर असलेला हा प्रकल्प पूर्ण करुन प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकाची गर्दी कमी करण्यासाठी कळवा ते ऐरोली एलिवेटेड लिंकची घोषणा करण्यात आली होती. या उन्नत स्वरूपाच्या रेल्वे मार्गामुळे कल्याणहून वाशीला जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्थानकात उतरण्याची गरज राहणार नाही.
प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन रखडल्याने ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका तब्बल एक तपाने पूर्ण झाल्याचा इतिहास ताजा असताना ठाण्याच्या विकासाचा विडा उचलणारे मुख्यमंत्री येत्या तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करुन दाखविणार का असा सवाल केला जात आहे.
कळवा ते ऐरोली उन्नत मार्गाने मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सोयीसाठी नवा उपनगरीय कॅारीडॅार मिळणार आहे. मात्र या प्रकल्पाचा एक भाग असलेल्या केवळ दिघा स्थानकाचे बांधकाम वर्षअखेर पूर्ण होणार आहे.
कळवा येथून जाणा-या 3 कि.मी.च्या उन्नत रेल्वे मार्गाचे सुरूवातीचे कळवा स्थानक ते दिघा स्थानकापर्यंत जाणारा उन्नत स्वरूपाचा मार्ग बांधण्यासाठी खाडीवर पुल बांधावा लागणार आहे. त्यामुळे 2.55 हेक्टर जागेपैकी0.47 हेक्टर खाजगी जागेच्या संपादनाची गरज असून तिचा ताबा मिळाल्यानंतर तीन वर्षांनी हा मार्ग पूर्ण होईल असे रेल्वेने म्हटले आहे.
राजकीय इच्छाशक्ती अभावी उपनगरीय रेल्वेचे अनेक पायाभूत प्रकल्प रखडले आहेत. ठाणे कर्मभूमी असणा-या मुख्यमंत्र्यांनी येथील रखडलेले रेल्वेचे प्रकल्प मार्गी लावत महाराष्ट्राच्या अर्ध्या लोकसंख्येला दिलासा द्यावा डोंबिवलीचे प्रवासी बळीराम राणे यांनी टीव्ही नाइन मराठीशी बोलताना केला आहे.
कळवा-ऐरोली एलिवेटेड लिंकसाठी एमयूटीपी योजने अंतर्गत एकूण 476 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 2.55 हेक्टर जमिन लागणार आहे. त्यापैकी 2.08 हेक्टर जागा सरकारी असल्याने तिचा ताबा मिळाला आहे.
मात्र उर्वरित जागा खाजगी मालकीची असल्याने ती ताब्यात येण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे तलावाच्या शेजारी चाळी असून त्या जागेवरवरूनच कळवा ते ऐरोली उन्नत मार्ग जाणार आहे. त्यासाठी 1080 घर व गाळ्यांना हटवून त्यांच्या पुनर्वसनासाठी एमएमआरडीएला प्रस्ताव पाठविला होता. मात्र त्यापैकी 924 जणांना भाड्यांची घरे देण्यास मंजूरी मिळाली आहे.
उरलेल्या 201 प्रकल्पबाधीतांची फेरतपासणी झाली असल्याने मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एमएमआरडीएला त्यांना घरे मिळण्यासाठी अर्ज केला आहे. तर 111 पात्र प्रकल्पग्रस्तांना घरासाठी अलाॅटमेंट पत्र मिळाले असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने म्हटले आहे.
हा मार्ग कल्याण येथून थेट जोडण्याची योजना होती. परंतू मध्य रेल्वेला आणखी एक टर्मिनल तयार हाेऊन नियोजनास अवघड जाईल म्हणून हा मार्ग कळवा येथे स्वतंत्र उन्नत स्थानक बांधून स्वतंत्र केला जाणार आहे. अन्यथा कल्याणहून थेट लोकलने वाशी – पनवेलला जाता आले असते.