भयानक! 40 विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस रेल्वे रुळावर अडकली आणि…, नागपुरात चित्तथरारक घटना
नागपुरात स्कूल बसमध्ये असलेल्या 40 विद्यार्थ्यांबाबत जे घडलं ते अतिशय चित्तथरारक होतं. या सर्व विद्यार्थ्यांचा जीव आज धोक्यात होता. पण एका सुज्ञ व्यक्तीने दाखवलेल्या प्रसंगावधानाने या सर्व विद्यार्थ्यांचे प्राण बचावले.
नागपुरात सुदैवाने एक मोठी दुर्घटना टळली आहे. 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस रेल्वे रुळावर अडकली होती. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला होता. विशेष म्हणजे बस अडकली त्यावेळी नागपूर-छिंदवाडा एक्सप्रेस जलद वेगाने त्यांच्या दिशेला येत होती. पण सुदैवाने एका सुज्ञ नागरिकाने प्रसंगावधान दाखवत लाल रंगाचे कठडे रेल्वे रुळावर ठेवले. ते रेल्वे चालकाला दिसले. त्यामुळे त्याने तातडीने ब्रेक दाबले आणि गाडी थांबली. या स्कूल बस सोबतच एक कारदेखील रेल्वे रुळावर अडकली होती. रेल्वे फाटक बंद झाल्यामुळे स्कूल बस आणि एक कार रेल्वे रुळाच्या मधोमध अडकले होते. पण सुदैवाने स्कूल बसमधील सर्व विद्यार्थी आणि कारमधील प्रवासी बचावले आहेत.
संबंधित घटना ही नागपूर-छिंदवाडा रेल्वेमार्गावरील खापरखेडा रेल्वे क्रॉसिंगवर घडली. स्कूल बस मुलांना शाळेतून त्यांच्या घरी सोडण्यासाठी जात होती. या दरम्यान ही स्कूल बस खापरखेडा रेल्वे क्रॉसिंगवर अडकली. ही बस रेल्वे रुळावर आली आणि नेमकं रेल्वे फाटक बंद झालं. या स्कूल बस सोबत एक कारदेखील रेल्वे रुळावरच अडकून पडली. यावेळी बसमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी खूप आरडाओरड केली. सगळ्यांनी बचावासाठी जोरदार आरडाओरड केली. अनेकांना काय करावं ते सूचत नव्हतं. विशेष म्हणजे समोरुन छिंदवाडा-नागपूर एक्सप्रेस जलद गतीने येत होती. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या अनेकांची पायाखालची जमीन सरकली होती. यावेळी एका सुज्ञ व्यक्तीने प्रसंगावधान दाखलच एक लाल रंगाचा कठडा रेल्वे रुळावर ठेवला.
पाहणाऱ्यांचा अक्षरश: घाम फुटला
संबंधित लाल रंगाचा कठडा छिंदवाडा- नागपूर एक्सप्रेस गाडीच्या चालकाला दिसला. त्यामुळे काहीतरी गडबड झाली असल्याचं चालकाच्या लक्षात आलं. यानंतर त्याने लगेच समयसूचकता दाखवत ब्रेक दाबला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अनेक नागरिकांचा अक्षरश: घाम फुटला होता. पण सुदैवाने मोठी दुर्घटना टळली होती.
यानंतर रेल्वे कर्मचाऱ्याने रेल्वे फाटक वरती केलं. स्कूल बस आणि कार रेल्वे फाटकाच्या बाहेर आले. यानंतर पुन्हा ते रेल्वे फाटक लावण्यात आलं. यानंतर संबंधित एक्सप्रेस गाडी पुढे सरकली. एका सुज्ञ व्यक्तीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. अर्थात यामध्ये रेल्वे चालकाचंदेखील तितकच महत्त्वाचं योगदान आहे. दरम्यान, स्कूल बस सुखरुप रेल्वे फाटकमधून बाहेर पडल्यानंतर सर्व 40 विद्यार्थ्यांनी सर्वांचे आभार मानले.