सुनील ढगे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : देशभरातून लाखो अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर येतात. यानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुविधेसाठी मनपातर्फे साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ मनपा नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांना मनपातर्फे योग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे. दीक्षाभूमी व संपूर्ण परिसरात स्वच्छता कायम राहील. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता केली जाईल.
मनपा उपयुक्त मिलिंद मेश्राम यांनी सांगितले की, नागपूर महापालिकेचे नियंत्रण कक्ष पुढील तीन दिवस 24 तास कार्यरत असणार आहे. यात घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे दीक्षाभूमी परिसराच्या चारही बाजूच्या रस्त्यांची साफसफाई करण्यात येणार आहे.
साफसफाईसाठी प्रत्येक पाळीत 20 कर्मचारी तैनात असणार आहेत. रस्त्यावर पडलेला कचरा, साफसफाईतील कचरा चारही रस्त्यावर असलेल्या 200 ड्रममध्ये साठवून, ड्रममधील कचरा Pick up करण्याकरिता 20 लहान वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
लहान वाहनातील कचरा मोठ्या दोन कॉम्पॅक्टरमध्ये घेवून भांडेवाडीत पोहोचविण्यात येणार आहे. परिसरात सी.सी.टीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहे. जलप्रदाय विभागातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे सार्वजनिक भोजनदान स्थळी असलेल्या पिण्याच्या पाण्याचे ड्रम टँकरच्या माध्यमातून पाणी भरून ठेवण्यात आले आहे.
रहाटे कॉलनी चौक ते लक्ष्मीनगर चौक -40 नळ, दीक्षाभूमी चौक ते काछीपुरा चौक 50 नळ, आयटीआय परिसरात 40 नळ लावण्यात आले आहेत. आकस्मिक प्रसंगी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता मनपा शाळेत विद्युत दिव्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिकेद्वारे 900 शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. यात माता कचेरी परिसरात 120 संडास सीट, आयटीआय परिसरात 320 शौचालय, मध्यवर्ती कारागृहाच्या जागेत 330 शौचालय, दीक्षाभूमी परिसरात 78 शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.
या 900 शौचालय परिसरात सुगंधित जंतूनाशक फवारणी करण्यात येणार आहे. याशिवाय नीरी रोड, काछीपुरा चौक, रहाटे कॉलनी चौक, लक्ष्मीनगर चौक मोबाईल टॉयलेट तयार करण्यात आले आहे.