नाशिकः मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि शहरातील इमारतींचा आढावा घेतल्यानंतर नाशिक महापालिका (Nashik Municipal corporation)आयुक्तांनी महत्त्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नाशिकमध्ये 1149 इमारती धोकादायक असून 75 इमारती (Nashik buildings) अतिशय धोकादायक आढळल्या आहेत. या इमारतींना महापालिका प्रशासनातर्फे अलर्ट जारी करण्यात आले आहे. तसेच अतिशय धोकादायक असलेल्या इमारतींतील नागरिकांना तत्काळ घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून जीर्ण झालेल्या इमारतींची कधीही पडझड होऊ शकते, असा अंदाज महापालिकेच्या अभियंत्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेतर्फे तातडीची उपाययोजना करण्यात येत आहे.
नाशिक महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार, शहरातील 1149 धोकादायक इमारती असून या सर्व धोकादायक इमारतींना नोटीसा बजावण्यात आल्या आहे. यात 75 अतिशय धोकादायक इमारती आहेत. 75 पैकी 20 इमारतींमधील पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. इमारत खाली करण्याआधी एरिया स्टेटमेंट लिहून घेण्याच्या आदेश देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार धोकादायक इमारती खाली करण्याचे काम सुरू आहे.
50 वर्षे उभारलेल्या रामसेतू पुलाला तडे गेल्याने तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट ककरण्याच्या सूचना महापालिका आयुक्ता रमेश पवार यांनी दिल्या आहेत. स्मार्टसिटी कंपनीने पूल तोडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र हा निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीत महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांचा समावेश आहे. या समितीने पुलाची पाहणी केली आहे. समितीने अहवाल दिल्यानंतर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अहवालात पूल तोडण्याची सूचना करण्यात आल्यास तो तोडला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
मागीलवर्षी या तारखेपर्यंत शहरात 196 मिमी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी 564 मिमी म्हणजे जवळपास अडीच पट जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पाऊस जास्त असल्याने खड्ड्यांची संख्या वाढली आहे. शहरात जवळपास साधारणत 6270 खड्डे पडले आहे. त्यातले जवळपास 3600 खड्डे बुजवण्यात आले असून उर्वरित खड्डे पुढच्या चार दिवसात बुजवले जातील, असा दावा महापालिकेतर्फे करण्यात आला आहे. खड्डे बुजवताना कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही आयुक्तांनी सांगितले.
गेल्या आठवडाभरापासून नाशिक शहरात संततधार पाऊस सुरु आहे. शहरातील अनेक भागात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत. पावसाळी वातावरणामुळे नळांना गढूळ पाणीपुरटा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे काविळीसह उलट्या, जुलाब, टायफॉइडचे रुग्ण वाढले आहेत. पावसाळ्यात जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिनेशन वाढवणे गरजेचे असताना प्रत्यक्षात पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.