महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार का? पाहा सुप्रिया सुळे काय म्हणाल्या

| Updated on: Sep 29, 2024 | 7:18 PM

सुप्रिया सुळे यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश आलं तर तुम्ही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार का? पाहा सुप्रिया सुळे काय म्हणाल्या
खासदार सुप्रिया सुळे
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश आलं तर तुम्ही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “महागाई, बेरोजगार आणि भ्रष्टाचार यांची प्रचंड मोठी आव्हानं आज महाराष्ट्रासमोर आहेत. ऐन सणाच्या वेळेस तेलाचा भाव प्रचंड वाढलेला आहे. खूप मोठी आव्हानं आज महाराष्ट्रासमोर आहेत. त्यामुळे पहिल्यांदा या ट्रिपल इंजिन भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे. स्वाभिमानी मराठी माणसाचे सरकार आणणं ही आता काळाची गरज आहे. पहिलं इलेकशन लढूया, महाराष्ट्राच्या समोर असणाऱ्या आव्हानांविरोधात लढू, मग मुख्यमंत्री व्हायचे का नाही ते पुढचं पुढे बघू. लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे, मायबाप जनतेसाठी लढण्याची गरज आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“जेव्हा तीनही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष एकत्र बसतील तेव्हाच निर्णय होईल. महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती राहील की, मुख्यमंत्री अशी व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल, महाराष्ट्राचे हित हेच त्याचे ध्येय असेल आणि दिल्ली पुढे तो झुकणार नाही. असा स्वाभिमानी मुख्यमंत्री महाराष्ट्रात असावा”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. “या ट्रिपल इंजिन भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे. महाराष्ट्रात स्वाभिमानी मराठी माणसाचे सरकार आणणं ही आता काळाची गरज आहे”, असंदेखील सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरुन टीका केली आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “मी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत या दोघांचेही स्टेटमेंट पाहिले आहेत, अनेक वर्तमानपत्रांमध्ये येत आहे. जे स्टेटमेंट वारंवार येत आहेत, त्या सगळ्यावरून असं दिसतंय की महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत. ही परिस्थिती वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या सर्व गोष्टींवरून दिसत आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट आहे की पुढची विकास कामे होणार नाहीत. असं वर्तमानपत्रांमध्ये आलेलं आहे”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीबाबत सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “विधानसभा निवडणूक लढायची की नाही याबद्दल हर्षवर्धन पाटील घट बसल्यानंतर निर्णय घेणार आहेत. त्यामुळे तोपर्यंत आपल्याला थांबवं लागेल, आणि गोविंद बागेत कोण गेलं होतं याची मला माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

सुप्रिया सुळे यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं. “देवेंद्र फडणवीस यांना आमच्या विरोधात बोलण्याशिवाय दुसरं काहीच नाही. सगळे इलेक्शन नुसते भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी असे आमच्या विरोधात बोलले. आता भ्रष्टाचाराचा भ्र पण काढत नाहीत. कारण भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले, ते आता कुठे बसलेत? स्वतःची काही विकासकामं नाहीत. स्वतःकडे काही सांगण्यासारखं नाही म्हणून नुसती टीका करत आहेत. पण त्यांची टीका आणि त्यांचं लक्ष्य हे फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच असतात”, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं.

‘अजित पवार गटाला दुसरं चिन्हं मिळावं’

“तुतारी वाजवणारा माणूस हे आमचे चिन्हं आहे. शरद पवार यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने पक्ष आणि चिन्हं काढून घेतलं. लोक यामुळे कन्फ्युज होत आहेत. परवा एका चॅनेलने माझ्यामागे दुसरच चिन्ह लावलं होतं. चॅनल कन्फ्युज होतोय तर सामान्य माणूस का होणार नाही? इलेक्शनसाठी त्यांनाही दुसरं चिन्ह देण्यात यावं, आम्हाला नाही तर त्यांनाही नाही. सुप्रीम कोर्टात ह्याचा निकाल होऊ द्या. ज्याच्या पदरात चिन्हं पडेल ते पडेल”, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.