वेगवेगळ्या मार्गांनी शिवाजी महाराजांची बदनामी केली जातेय, विकृती रोखली पाहिजे: उदयनराजे भोसले
सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सर्वसामान्यांच्या हाती सत्ता आली पाहिजे, अशी गांधीजींची भूमिका होती. पण ते झालं नाही. आज घराणेशाही निर्माण झाली आहे.
सातारा: ज्या थोर पुरुषांनी लोकांसाठी आपलं आयुष्य झिजलं. वाटेल त्या परिस्थितीत लोकांचं कल्याण व्हावं, लोकं मोठी व्हावीत, त्यांचा विकास व्हावा हाच त्यांचा ध्यास होता. पण या महापुरुषांची बदनामी केली जात आहे. वारंवार केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचीही वेगवेगळ्या मार्गांनी बदनामी केली जात आहे. चित्रपट आणि विधानातून ही बदनामी होत आहे. ही विकृती दिवसे न् दिवस कमी होण्याऐवजी वाढत आहे. ती वेळीच रोखली पाहिजे, असं आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं.
जग खूप वेगाने पुढे जात आहे. लोक फारसा विचार करत नाही. लोकांनी विचार करायचं बंद केलं आहे. प्रत्येकाचं जीवन व्यस्त झालं आहे. लोक कामात मग्न झाले आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मूलभूत विचाराचा लोकांना हळूहळू विसर पडू लागला आहे. हे एका दिवसात झालं नाही, अशी सल उदयनराजे भोसले यांनी बोलून दाखवली.
शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचा विचार दिला होता. तो विचार राहिला आहे का? कारण नसताना जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहे. भेदभाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे सर्वधर्म समभाव हा विचार मागे पडताना दिसत आहे, असं ते म्हणाले.
राज्यकर्त्यांनी नेहमीच आपला वैयक्तिक स्वार्थ पाहिला. लोकशाहीतील राजांनी दिलं तरी काय? आपण इस्लामिक देश पाहिले तर तिथे आजही राजेशाही आहे. राजेशाही अस्तित्वात ठेवावी असं शिवाजी महाराजांना वाटलं असतं तर आजही या देशात राजेशाही राहिली असती. लोकांचा राज्यकारभारात सहभाग असावा असं शिवाजी महाराजांना वाटलं आणि लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली गेली, असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं.
आज लोकशाहीच्या नावाखाली देशात घराणेशाही आली आहे. त्याच त्याच घरातील लोक सत्तेत येऊ लागले आहेत. याच लोकांना ज्ञान आहे आणि इतरांना नाही, असं बिंबवलं जात आहे. त्यामुळे विकेंद्रीकरणाची संकल्पना मागे पडली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सर्वसामान्यांच्या हाती सत्ता आली पाहिजे, अशी गांधीजींची भूमिका होती. पण ते झालं नाही. आज घराणेशाही निर्माण झाली आहे. मूठभर लोकांच्या हाती सत्ता आली आहे. राजकारणात घराण्याची मक्तेदारी वाढली आहे, अशी टीका त्यांनी केली.
आज आपण स्वत:ला सावरलं नाही. तर देशाचे 29 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. महासत्ता लांब राहिली महातुकडे व्हायला किती वेळ लागेल? शिवाजी महाराजांचा विचार स्वीकारला नाही तर वाताहत होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.