नांदेड : शहरात बेवारस, स्वमग्न आणि मानसिक रुग्णांचा अवतार हा विचित्र असतो. अश्या या मंडळीपासून सर्वसामान्य फटकूनच वागतात, त्यातून अश्या बाधित मंडळींचे आणखीनच खच्चीकरण होते. त्यामुळे अश्या भान हरपलेल्या मंडळींना समाजात आणण्यासाठी नांदेडमध्ये एका अवलीयाने एक उपक्रम सुरू केलाय. त्यातून निराधार, स्वमग्न आणि मानसिक रुगणांचा कायापालट केल्या जातोय…काय आहे हा अनोखा उपक्रम ते आपण पाहुयात…. (Ministration for psychiatric patients from Dilip Thakur Kayapalat Sanstha Nanded)
बहुभाषिक लोकांचं शहर म्हणून आता नांदेड जाऊ लागलंय. रेल्वेच्या सेवेमुळे नांदेड शहर भारताच्या कानाकोपऱ्याशी जोडलं गेलंय. त्यातून शहरात स्वमग्न, मानसिक रुग्ण आणि भिकारी मंडळींचं प्रमाण देखील वाढलंय. मुळात रोगाशी लढत असणाऱ्या या मंडळींचं स्वतःकडे दुर्लक्षच असतं… त्यातून त्यांचा अवतार हा विक्षिप्त झालेला असतो, हे त्यांच्याही लक्षात येत नाही. मात्र त्यांच्या या अवतारामुळे सर्वसामान्य या मंडळी अशा लोकांना आपल्या जवळही येऊ देत नाहीत. मदत करणं तर फार दूरची गोष्ट…आधीच आजारी असलेली ही लोक त्यामुळे अनेकदा चिडतात आणि विक्षिप्त हालचाली करून स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. खरं तर त्यांना तहान भूक लागलेली असते पण त्यांच्या अवतारामुळे त्यांना कुणी जवळही करत नाही..!
नांदेडमध्ये भाजप या राजकीय पक्षात कार्यरत असणाऱ्या दिलीप ठाकूर यांच्या लक्षात ही बाब आली. दिलीप ठाकूर यांचा पिंडच समाजसेवेचा आहे. त्यातून त्यांनी मानसोपचार तज्ञ मंडळींशी सल्लामसलत करत कायापालट नावाचा उपक्रम सुरु केलाय. दिलीप ठाकूर यांच्या या उपक्रमाला अनेकांनी मदत करण्याचे ठरवलं आणि कायापालट या उपक्रमाला सुरुवात झाली.
शहरात जिथे कुठे स्वमग्न, मानसिक रुग्ण अथवा भिकारी दिसेल तिथे दिलीप ठाकूर आपल्या टीमसह जातात. आधी विचित्र दिसणाऱ्या स्वमग्न, मानसिक रुग्णाची समजूत घालून त्याला स्वच्छ केलं जाते. त्यासाठी त्यांनी एक न्हावी सोबतच ठेवलाय. बाधित रुग्णांची दाढी कटिंग केल्यानंतर त्याला अंघोळ घालून नवे कपडे देण्यात येतात. त्यानंतर त्याला पोटभर जेवण आणि वरुन काही रुपये देखील भेट म्हणून देण्यात येतायत. यामुळे विचित्र आणि किळसवाण्या दिसणाऱ्या या मंडळींचा कायापालट होतोय.
एकीकडे कोरोना संसर्गाच्या फैलावाच्या भीतीने आपले जवळचे नातेवाईक एकमेकांपासून दूर पळत आहेत. अशा स्थितीत नांदेडमधल्या अवलियाचा हा उपक्रम समाजोपयोगीच म्हणावा लागेल. यातून काय साध्य होईल असे विचारल्यावर संयोजक दिलीप ठाकूर ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा; असं तीन शब्दात उत्तर देतात.
त्याबरोबरच चांगल्या अवतारामुळे किमान या मंडळीपासून लोक दूर जाणार नाहीत, आणि त्यांची उपासमार तरी टळेल अशी भावना असल्याचे ठाकूर यांनी सांगितलं. खरं तर अशा उपक्रमाची सर्वत्रच गरज आहे. कारण मनोरुग्णाच्या भावना समजून घेतल्या तरच त्यांचा आजार कमी होतो, असं मानसोपचार तज्ज्ञही सांगत असतात.
Ministration for psychiatric patients from Dilip Thakur Kayapalat Sanstha Nanded)
हे ही वाचा :
अधिकाऱ्यांची मनमानी, सरपंचांची सटकली, जिल्हा परिषदेतच फाईल जाळल्या…
अंगावर वीज पडून नांदेडमधल्या शेतकऱ्याचा मृत्यू, गावावर शोककळा