रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पाऊस, जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, मच्छी मार्केटमध्ये शिरलं पाणी

| Updated on: Sep 26, 2024 | 10:25 PM

खेडमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. त्यामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सततच्या पावसामुळे आज संध्याकाळी सात वाजता जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीपर्यंत पोहोचलं होतं. यानंतर आठ वाजल्यापासून जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली.

रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पाऊस, जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, मच्छी मार्केटमध्ये शिरलं पाणी
रत्नागिरीच्या खेडमध्ये मुसळधार पाऊस, जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
Follow us on

महाराष्ट्रात परतीचा पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात तर परतीच्या पावसाचं रौद्र रुप बघायला मिळत आहे. मुसळधार पावसाने खेडमध्ये जगबुडी नदीच्या पाणी पातळीवर प्रचंड वाढ झाली आहे. पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेडच्या मच्छी मार्केट परिसरात जगबुडी नदीचं पाणी शिरलं आहे. पाऊस सध्या थांबला आहे. पण जगबुडी नदीची वाढलेली पाणी पातळी पाहून स्थानिकांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासन सज्ज झालं आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीची वेळ असल्याने प्रशासनाकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. पाऊस सुरुच राहिला तर जगबुडी नदीचं पाणी खेडमध्ये शिरु शकतं.

जगबुडी नदीची पाणी पातळी आज संध्याकाळी सात वाजता इशारा पातळीपर्यंत पोहोचली होती. यानंतर आठ वाजल्यापासून जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली. खेडच्या बाजारपेठेत जगबुडी नदीचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाकडून सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. तर पावसाने आता बंद व्हावं, अशी प्रार्थना नागरिकांकडून केली जात आहे. पाऊस थांबला तर नदीच्या पाणी पातळीत घट होऊ शकते. त्यामुळे संभाव्य धोका देखील टळू शकतो.

अकोल्यात दोन जण नदीच्या प्रवाहात वाहून गेले

दरम्यान, अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यात दोन जण नदीच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. त्यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला आहे. सारंगधर सावळे आणि भिकाजी भिमराव इंगळे असं नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या व्यक्तींची नावे आहेत. बाळापूर येथील मन नदी पात्र ओलांडत असताना दोघेही जण वाहून गेले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच वंदे मातरम आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. पथकाकडून शोधकार्य सुरू आहे. तर डोंगरगाव येथील भिकाजी इंगळे यांचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला आहे. कळंबा येथील सावळे याचा अजूनही शोध सुरू आहे. तर मृतक सावळे आणि इंगळे हे दोघे शेतमजूर होते. तर घटनास्थळी उरळ पोलीस दाखल असल्याची माहिती मिळत आहे.