Breaking news : संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, बड्या नेत्याकडे दिला होता प्रस्ताव; नितेश राणे यांनी बॉम्बच टाकला
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने तुम्ही फक्त 11 बाजार समित्यांवर निवडुन आला आहात. भाजप एक नंबर वर आहे. त्यामुळे राऊतांनी बाता मारू नये. आम्हीच नंबर वन आहोत आणि राहणार आहोत, असा दावा नितेश राणे यांनी केला.
रत्नागिरी : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी स्वत:च्या नावाचा प्रस्ताव दिला होता. पण उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव लाथाडल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपच राज्यातील नंबर वन पक्ष ठरला आहे. राऊत यांनी उगाच गमजा मारू नये, असा हल्लाही नितेश राणे यांनी चढवला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
2019ला मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांकडे स्वत:च्या नावाचा प्रस्ताव दिला होता. शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी संजय राऊत यांचं नाव उद्धव ठाकरेंकडे सूचवलं होतं. राऊतांना मुख्यमंत्री करा म्हणून सांगितलं होतं. पण उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळच होतं. त्यांनी राऊतांचं नाव नाकारलं. तेव्हापासून राऊत यांची नाटकं आणि षडयंत्र सुरू झाली आहेत. हा घरात घेण्याच्या लायकीचा नाही, असा धक्कादायक गौप्यस्फोट नितेश राणे यांनी करून खळबळ उडवून दिली आहे.
भांडणं लावणं हा त्यांचा धंदा
संजय राजाराम राऊत हे पूर्ण नाव किती लोकांना माहिती आहे? असं मला महाराष्ट्राला विचारायचं आहे. कुठल्या बापाचे नाव लावतोस हे संजय राऊतला विचारायचं आहे. कोणाचे बाप काढायचे, भांडण लावायचे, भावा भावात वाद लावायचे हे पहिल्यापासून त्याचे धंदे आहेत. पवार कुटुंबियातही भांडणे लावण्याचे काम त्याने सुरू केले आहे. हा याचा आताचा कार्यक्रम सुरू आहे. अजितदादांनी त्यांना खडसावले. पवार साहेब ही त्यांना बोलले आहेत, असा दावा नितेश यांनी केला आहे.
आदित्य-तेजसमध्ये वाद लावले
आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यातही राऊत यांनी वाद लावले आहेत. 1998 ला राऊत यांना उमेदवारी मिळणार नसल्याची चर्चा होती. तेव्हा, मला खासदारकी दिली नाही तर या बाप लेकांना (बाळासाहेब-उद्धव) पोचवतो, असं संजय राऊत म्हणाले होते. हा घरात घेण्याचे लायकीचा नाही. उद्धवजींना सांगेन, तुमच्या दोन्ही मुलांना एकत्र ठेवायचे असेल तर यांना लांब ठेवा, असं ते म्हणाले.
आईवर दबाव
काल आदित्य ठाकरेंनी उल्लेख केला की नितेश राणेंपेक्षा माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. हो ना तुझ्यावर चांगले संस्कार झाले असते तर दिशा सालियन जिवंत असली असती. उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते तेव्हा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मुख्यमंत्री होण्यासाठी आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या आईवर दबाव आणला होता. जोपर्यंत माझं नाव पुकारलं जात नाही तोपर्यंत दाओस मधून येणार नाही असं म्हणाला होता. दावोसच्या नावाखाली आदित्य ठाकरे लंडनला होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
तुम्हाला गुंड का लागतात?
उद्धव ठाकरे बारसूला येणार आहेत. त्यासाठी त्यांनी काही गुंडांना बोलावले आहे. काही गुंडांना कालपासून मेसेज जात आहेत. चला कोकणात जायचं आहे. याचा इन्कार केलात तर मी स्क्रीन शॉटसह जाहीर करेन. बारसूला येण्यासाठी तुम्हाला गुंड का लागतात? पोलिसांना विनंती करतो की. उद्धव ठाकरेंबरोबर येणाऱ्या सर्वांची चौकशी करा, असं ते म्हणाले.