विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात सत्ता स्थापन झाली आहे. निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार सत्तेत आलं आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीची आकडेवारी पाहिली तर मविआला 50 जागांचा देखील आकडा गाठण्यात यश आलेलं नाही. याउलट महायुतीच्या यशाची गाडी ही 230 जागांपर्यंत गेली आहे. त्यामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. विरोधकांकडून या निकालावरुन विविध प्रकारचे आरोप केले जात आहे. विरोधकांकडून महायुती सरकारवर ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला जातोय. विरोधकांकडून ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीकडून तीच मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी थेट राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलं आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (6 डिसेंबर) राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांना पत्र लिहिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील तात्पुरत्या मतदारांच्या मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करण्यासाठी आंबेडकरांनी हे पत्र लिहिले आहे. या पत्रात प्रकाश आंबेडकर यांनी तीन प्रश्न विचारले आहेत. मतदाराला त्याचे/तिचे/त्यांचे मत देण्यासाठी लागणारा वेळ किती? जिल्हा निवडणूक अधिकारी/रिटर्निंग अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते संध्याकाळी 6 या वेळेत झालेल्या मतांची नोंद केली आहे का? आणि असल्यास, त्याचा तपशील काय?; जिल्हा निवडणूक अधिकारी/रिटर्निंग ऑफिसर यांनी 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:59 वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना जारी केलेल्या टोकनची संख्या नोंदवली आहे का आणि असल्यास, त्याचा तपशील काय? असे तीन प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उस्थित केले आहेत.
I wrote to the @CEO_Maharashtra yesterday.
I wrote the letter to raise the serious concern of the variation in the provisional voter turnout and the final data in the recently-concluded Maharashtra Vidhan Sabha elections.
I also sought answers to 3 questions I had asked —
1.… pic.twitter.com/HB5Maom1pU
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) December 7, 2024
आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आणि आमच्या चिंतेचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे. कारण ते भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रिया आणि आचरणावरील घसरलेल्या आणि डळमळलेल्या विश्वासाची दखल घेतील, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोग यावर काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने आक्रमकपणे EVM मशीनमधील घोळ बाहेर काढले आहेत आणि जनजागृतीसाठी EVM हटाव स्वाक्षरी मोहीम राबवली आहे.