Weather report : पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार? हवामान विभागानं काय इशारा दिला? वाचा सविस्तर
पुणे आयएमडी हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले, की नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या घाटात 6 जुलै ते 8 जुलै या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे : राज्यात सध्या जोरदार पाऊस (Heavy rain) सुरू आहे. त्यात कोकणातील जिल्ह्यांमध्ये तर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य लोक विशेषत: पुणेकर पावसाची अतुरतेने वाट पाहत होते. काल पुण्यात मोसमातील चांगला आणि जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. म्हणजे उकाडा आणि पाणीटंचाई (Water shortage) यामुळे वैतागलेल्या पुणेकरांना आता उलट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. पुढील पाच दिवस कोकण आणि 7 आणि 8 जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला. ऑरेंज अलर्ट (Orange alert) हवामान खात्याने जारी केला असून मुसळधार पावसासाठी तयार राहा असा इशाराच दिला आहे.
पूरपरिस्थितीचा इशारा
7 आणि 8 जुलैसाठी हा ऑरेंज अलर्ट आहे आणि त्याचा परिणाम रस्त्यांना स्थानिक पूर, सखल भागात पाणी साचणे आणि मुख्यतः शहरी भागात अंडरपास बंद होण्याच्या स्वरूपात असू शकतो, असे आयएमडीने म्हटले आहे. अतिवृष्टीमुळे दृश्यमानतेत अधूनमधून घट, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे प्रमुख शहरांमधील वाहतूक विस्कळीत होणे, असुरक्षित घर आणि इतर तकलादू बांधकामांचे नुकसान होण्याची शक्यता याबरोबरच भूस्खलनदेखील होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
204.5 मिमीपेक्षाही अधिक पाऊस!
पुणे आयएमडी हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले, की नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या घाटात 6 जुलै ते 8 जुलै या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 7 जुलैपासून मुसळधार (24 तासांच्या कालावधीत 204.5 मिमी इतका किंवा त्याहून अधिक) पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. चालू पंधरवड्याच्या अखेरीस, महाराष्ट्रातील सर्व उपविभागांची तूट भरून काढण्याची आणि सामान्य मान्सूनच्या पावसाच्या श्रेणीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
पहिला चांगला पाऊस
कश्यपी पुढे म्हणाले, की 7 ते 9 जुलै दरम्यान पुणे शहरातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागांसाठी या पावसाळ्यात येणारा पाऊस हा पहिला चांगला असेल. मान्सून सध्या सक्रिय आहे. जुलैमध्ये पुण्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि घाटांवरही जुलैमध्ये सामान्य पाऊस पडू शकतो, अशी माहिती त्यांनी दिली.