IAS प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी, दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता पूजा खेडकर यांच्या आईचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पूजा खेडकर यांच्या आईचा धमकी देतानाचा हा व्हिडिओ आहे. बंदुक घेऊन मुळशीतल्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा हा व्हिडिओ आहे. त्यांच्या शेजारी सुरक्षारक्षक आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. प्रोबेशनर असताना पूजा खेडकर त्यांच्या वर्तनामुळे अडचणीत आल्या. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी त्यांच्या संपत्ती बद्दलही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. बेहिशोबी मालमत्तेचा त्यांच्यावर आरोप केला आहे. डॉ. पूजा खेडकर IAS कशा झाल्या? यावरच अनेक प्रश्न आहेत.
पूजा खेडकर यांनी आयएएससाठी दृष्टिहीन आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिलं होतं. असं करुन त्यांनी काही सवलती मिळवल्या. त्यावरुन वाद सुरु झाला. या सर्व प्रकरणाची आता थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. केंद्राने या प्रकरणासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे. ही एक सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. त्यात अतिरिक्त सचिव दर्जाचा अधिकारी असणार आहे.
बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांचा मुळशी तालुक्यातील धडवली गावातला पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकवतानाचा व्हिडिओ व्हायरल. धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती, ती ताब्यात घेताना शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याला जेव्हा शेजारच्या जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी विरोध केला, तेव्हा मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या, आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले. या शेतकऱ्यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता वरून दबाव आला. त्यांची तक्रार नोंदवली गेली नाही अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पूजा यांच्या बंगल्यावर काय कारवाई?
दरम्यान पुणे महापालिकेच पथक जेसीबीसह पूजा खेडकर यांच्या निवासस्थानाबाहेर दाखल झालय. बाणेर रोडवर पूजा यांचा बंगला आहे. पूजा यांच्या बंगल्यावर काय कारवाई करणार? याबद्दल पुणे महापालिकेने ठोस माहिती दिलेली नाही. सध्या पूजा यांची पुण्यावरुन वाशिमला बदली झाली आहे. प्रोबेशनर असताना ऑडी गाडीतून येणं, दुसऱ्यांची केबिन बळकावणं, अधिकाऱ्यांना त्रास देणं या वर्तनामुळे डॉ. पूजा खेडकर नजरेत आल्या.