पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक सर्वाधिक चर्चेत राहणार आहे. बारामती मतदार संघात पवार कुटुंबियात लढत होणार आहे. शिरुरमध्ये डॉ.अमोल कोल्हे यांचा पराभवासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी मंगळवारी शिवाजी आढळराव पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. पुणे शहरात भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर उमेदवार असणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कधी शरद पवारांची भेट घेणारे वसंत मोरे मंगळवारी रात्री मराठा समाजाच्या बैठकीत पोहचले. यावेळी त्यांनी पुण्यातून खासदार होण्यासाठी मराठा समाजाचे सहकार्य मागितले.
वसंत मोरे महाविकास आघाडी किंवा अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नसली तरी पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी मिळेल त्यांचे सहकार्य घेण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. वसंत मोरे मंगळवारी पुण्यात झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत पोहचले. ही बैठक लोकसभा निवडणुकीसंदर्भात होती. यामुळे पुणे लोकसभेसाठी मोठा ट्विस्ट आला आहे.
वसंत मोरे यांनी सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या बैठकीला हजेरी लावली. पुण्यात खासदार होण्यासाठी सकल मराठा समाज आणि वंचितने सहकार्य करावे, अशी भूमिका बैठकीत वसंत मोरे यांनी मांडली. मी पुण्यातून १०० टक्के खासदार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे एक राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी केल्या. शिवसेनाही दोन केल्या. यामुळे भाजपचा हा प्रकार थांबवण्यासाठी आपण निवडणूक लढवणार आहे. येत्या ७ तारखेला वसंत मोरे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची बैठक घेण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक मतदार संघातून मराठा समाजाने एक उमेदवार द्यावा, त्याबाबतचा निर्णय बैठकीत घेण्याचे त्यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे मराठा समाजाच्या बैठकीत गेले. आता त्यांना मराठा समाज उमेदवार जाहीर करणार का? हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे.