महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राज ठाकरे यांचा हा दौरा सुरु आहे. परंतु या दौऱ्यात पक्षातील गटबाजी समोर आली आहे. या गटबाजीमुळे राज ठाकरे नाराज झाले. त्यांनी वाशिम जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारणी बरखास्त केली. आता लवकरच नवीन कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा मनसे संपूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी, महायुती आणि मनसे असा तिरंगी सामना अनेक ठिकाणी होणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
राज ठाकरे रविवारी सकाळी वाशिममध्ये पोहचले. त्यावेळी पक्षातील दोन गटाबाजी पाहून ते नाराज झाले. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी दोन जिल्हाध्यक्षच्या गटबाजीवर राज ठाकरे नाराज झाले. त्यामुळे लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन कार्यकारिणीत एक जिल्हाध्यक्ष आणि एकच शहराध्यक्ष करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज ठाकरे यांनी वाशिममध्ये अर्धा तास पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते स्वतः गाडी चालवत अकोल्यासाठी रवाना झाले. यावेळी त्यांनी वाशिममध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढणार की नाही? स्पष्ट केले नाही.
राज ठाकरे यांनी राज्यात विधानसभेच्या २०० ते २२५ जागा लढवण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. तसेच वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध उमेदवार मनसे देणार आहे. मनसेने काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याचे राज ठाकरे यांनी शनिवारीच जाहीर केले. यामुळे महायुतीविरोधाही मनसे असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.