मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाच वातावरण आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, तसच मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी बीड जिल्ह्यातीत रेणापूर येथे आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी व त्यांचा मुलगा दोघे या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला आहे.
रेणापूरच्या या आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना सहआरोपी करुन 302 चा गुन्हा दाखल करा तसच त्यांच्यावर कोणीतही कारवाई न करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करा” अशी मागणी मोर्चात सहभागी झालेल्या एका व्यक्तीने केली. “शासनाने पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घ्यावी व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी” अशी मागणी दुसऱ्या आंदोलकाने केली. “संतोष देशमुख यांच्यासारख्या सरपंचाचा बेदम मारहाण करुन निर्घृण खून करण्यात येतो, मग आमच्यासारख्या सर्ववसामान्यांच काय? असा प्रश्न पडतो. आरोपींवर मोक्का अतंर्गत कारवाई करुन फाशीची शिक्षा द्यावी” अशी मागणी आणखी एका मोर्चेकऱ्याने केली.
‘….तर महाराष्ट्रातली जनता हा कायदा हातात घेईल’
“संतोष देशमुख यांची क्रूर हत्या होऊन आज 18 दिवस लोटलेत, राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणेला आरोपी सापडत नाही, त्यातून प्रशासनाचा दुबळेपणा जनतेसमोर येत आहे. रेणापूर येथे जनता आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तो पर्यंत हे आंदोलन महाराष्ट्रभर होईल, या आंदोलनाची दखल घ्यावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम करावं ही आमची मागणी आहे. आज महाराष्ट्र बघत आहे, कानाकोपऱ्यात गुंडगिरीच साम्राज्य पसरलेलं आहे. आरोपी प्रशासनाला सापडत नसतील, तर महाराष्ट्रातली जनता हा कायदा हातात घेईल” अशी संतप्त प्रतिक्रिया एका आंदोलकाने व्यक्त केली.