माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याबाबत खळबळजनक विधान केलं आहे. गिरीश महाजन काय बोलतात, काय करतात हे मी बोलू इच्छित नाही. त्यांच्यासाठी ते अडचणीचं ठरेल, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. पवार यांना नेमकं काय सूचवायचं आहे? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. शरद पवार हे जळगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार रॅलीत भाग घेतला. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं.
विरोधकांचा सुपडा साफ होईल असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. त्याबाबत तुमचं काय मत आहे? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी सूचक उत्तर दिलं. महाजन काय बोलतात आणि करतात यावर मी भाष्य करू इच्छित नाही. ते फार अडचणीचं असेल. त्यामुळे मी भाष्य करू इच्छित नाही. व्यक्तीगत कुणासंबंधात मी उत्तर देऊ इच्छित नाही, असं शरद पवार म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केलं. एखाद्याला वैयक्तिक त्रास देण्याचं काम सुरू आहे. यापूर्वी असं कधी होत नव्हतं. त्यामुळे अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. कदाचित खडसेंनाही त्रास झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून त्यांना काही निर्णय घ्यावा लागला. एका विशिष्ट परिस्थितीत त्यांना नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागला असेल, असं शरद पवार म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला का? असा सवाल केला असता पवार यांनी थेट भाष्य करणं टाळलं. त्यांचा राजीनामा आला की नाही माहीत नाही. कारण मी संघटनेचं काम पाहत नाही. त्यावर जयंत पाटीलच सांगू शकतील, असं पवार म्हणाले. या भागात जे लोक प्रभावीपणे काम करतात त्यापैकी खडसे एक होते. पण उद्धव ठाकरे आणि काँग्रेससह आमच्याकडे मेहनत करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कुणाचीही आम्ही उणीव भरून काढू शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राजकारणात जुमलेबाजी आणण्याचं काम मोदींनी केलं. देशाला पुढे कसं नेणार आणि आजचे प्रश्न कोणते यावर ते बोलत नाहीत. मी नेहरूपासून ते सर्व पंतप्रधानांच्या सभा ऐकल्या आहेत. राष्ट्र, विकास आणि त्याबाबतची आखणी त्यावर ते बोलायचे. पण मोदी त्यावर काहीच बोलत नाही. ते फक्त टीका करतात. आणि व्यक्तिगत हमले करतात. काँग्रेसवर बोलत असतात. पण भविष्यात देशाचा विकास कसा करणार, वाटचाल कशी असेल यावर बोलत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.