सरसंघचालकजी, आधी फडणवीस यांचे कान उपटा; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
"देवेंद्र फडणवीस यांचे कान उपटा. त्यांना सांगा. महाराष्ट्र शांत हवा आहे. इथे संप्रादायिक विभाजन करू नका", अशा शब्दात सुषमा अंधारेंनी टीका केली.
Sushma Andhare On Devendra Fadnavis : शिवसेना ठाकरे गटाच्या पारंपारिक दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. या मेळाव्याच्या सुरुवातीला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दणक्यात भाषण केले. यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस आणि आरएसएसवरही टीका केली. “देवेंद्र फडणवीस यांचे कान उपटा. त्यांना सांगा. महाराष्ट्र शांत हवा आहे. इथे संप्रादायिक विभाजन करू नका”, अशा शब्दात सुषमा अंधारेंनी टीका केली.
सुषमा अंधारे यांनी भाषण करतेवेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सरसंघचालकांनी घेतलेल्या दसरा मेळाव्याचाही उल्लेख केला. “आज सर्व जातीची माणसं दसरा मेळावा साजरा करत आहेत. या निमित्ताने राज्यभरात दसरा मेळावा साजरा करत आहेत. सकाळी संघाचा मेळावा झाला. मोहन भागवत म्हणाले की, द्वेष संपला पाहिजे. सांप्रदायिक विभाजन होता कामा नये. देश मजबूत झाला पाहिजे. दुर्बल घटकांना सोबत घेतलं पाहिजे. सरसंघसंचालकजी तुमचं म्हणणं सर आँखोपर. पण तुम्ही हे सांगताय कुणाला?” असा सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला.
“मराठा आणि ओबीसीचं कार्ड खेळलं जातंय”
“विविध जातीचे लोकं गुण्या गोविंदाने नांदतात. द्वेष बुद्धी संपवण्याचंच असेल तर हा सल्ला सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांना द्यावा. आम्ही हातजोडून विनंती करतो. ज्यांनी माणसात माणूस ठेवला नाही. जातीत जात ठेवली नाही. कोकणात न चालणारी चिल्लर, बाजारातून रद्दबादल झालीय, अशी चारआणे बार आणे चिल्लर तुम्ही आणत आहात. तर देवेंद्र फडणवीस यांचे कान उपटा. त्यांना सांगा. महाराष्ट्र शांत हवा आहे. इथे संप्रादायिक विभाजन करू नका. आधी चार आणे बार आणे चिल्लर मुस्लिम द्वेष करत होती. आम्ही हिंदूंचं अभिनंदन करतो, त्यांनी कमालीचा संयम दाखवला. त्यांनी कवडीची किंमत दाखवली नाही. आता त्यांनी दुसरा खेळ सुरू केला आहे. हिंदू मुस्लिम कार्ड चालत नाही म्हटल्यावर मराठा आणि ओबीसीचं कार्ड खेळलं जात आहे”, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
“कोण राजकारण करतंय?”
“एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी जातीजातीत भेद निर्माण केले. कारण लोकांमध्ये गेल्यावर लोक प्रश्नविचारतील याची त्यांना भीती वाटत आहे. या प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे नाही. म्हणून ते राजकारण करत आहेत. आपण त्यांना काही विचारलं तर सांगतात यावर राजकारण करू नका, हे बोलू नका. ते बोलू नका. कोण राजकारण करतंय? कोणती कामे त्यांनी केली”, असे सुषमा अंधारेंनी म्हटले
“आर्थिक प्रश्नावर बोलत नाहीत”
“गावात रस्ते नाही, गटर नाही, मीटर नाही, कुठे गेले हजारो कोटी तुमचे. किती खोटं बोलाल. खोटे आकडे देता. सोयाबीनवर बोलत नाही, शेती मालावर बोलत नाही. ते जातीपातीच्या प्रश्नावर ते बोलत असतात. पण आर्थिक प्रश्नावर बोलत नाहीत”, असेही सुषमा अंधारे म्हणाले.