विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमास सत्ताधारी आमदारांची दांडी, 14 पैकी केवळ एकाची उपस्थिती

| Updated on: Sep 29, 2024 | 2:35 PM

सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा आमदार आहेत. 1 विधानपरिषद सदस्य आहेत. दोन खासदार आहेत. त्यात प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील हे दोन खासदार वगळता सर्व सत्तेतील आमदार आहेत. परंतु सुभाष देशमुख वगळता कोणीही या महत्वाच्या कार्यक्रमाला आले नाही.

विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमास सत्ताधारी आमदारांची दांडी, 14 पैकी केवळ एकाची उपस्थिती
सोलापूर विमानतळ
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे आज ऑनलाईन उद्घाटन झाले. 2009 सालापासून बंद असलेली प्रवासी वाहतूक सेवा अखेर 2024 साली सुरू होणार आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीच्या अडथळ्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विमान सेवा रखडली होती. त्यानंतर 2023 साली अखेर ही चिमणी पाडण्यात आली आणि विमानतळ सुरु झाले. या कार्यक्रमास अनेक बड्या नेत्यांची उपस्थिती होती. मात्र, सोलापूर विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार सुभाष देशमुख वगळता इतर एकही विद्यमान आमदारांची, खासदारांची उपस्थिती नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअल उपस्थित असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधी अपवाद वगळता आले नाहीत.

या लोकप्रतिनिधींची कार्यक्रमास दांडी

सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 विधानसभा आमदार आहेत. 1 विधानपरिषद सदस्य आहेत. दोन खासदार आहेत. त्यात प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील हे दोन खासदार वगळता सर्व सत्तेतील आमदार आहेत. परंतु सुभाष देशमुख वगळता कोणीही या महत्वाच्या कार्यक्रमाला आले नाही. सचिन कल्याणशेट्टी ( भाजप अक्कलकोट आमदार), विजयकुमार देशमुख (भाजप उत्तर सोलापूर), राजेंद्र राऊत (भाजप पुरस्कृत, बार्शीचे आमदार), समाधान आवताडे, (भाजप, पंढरपूरचे आमदार), राम सातपुते (भाजप – माळशिरस आमदार), शहाजीबापू पाटील (शिवसेना शिंदे गट – सांगोला आमदार), यशवंत माने (राष्ट्रवादी अजित पवार गट – मोहोळ आमदार ) बबनराव शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार गट – माढा आमदार ), संजय शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार गट पृरस्कृत अपक्ष – करमाळा आमदार ) खासदार प्रणिती शिंदे ( शहरमध्य ), धैर्यशील मोहिते पाटील ( शरद पवार गट – खासदार, माढा लोकसभा) हे उपस्थित नव्हते. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली आहे. कार्यक्रमाला सुभाष देशमुख (आमदार भाजप दक्षिण सोलापूर) आणि माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी उपस्थित होते.

का रखडले होते काम

सोलापूर विमानतळाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीच्या अडथळ्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विमान सेवा रखडली होती. त्यानंतर 2023 साली अखेर ही चिमणी पाडण्यात आली आणि आज प्रत्यक्ष विमानतळ सुरू झाले. 1948 साली सोलापूरच्या होटगी रोड परिसरात विमानतळ उभे करण्यात आले होते. त्यानंतर 2009 साली तत्कालीन पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नामुळे प्रवासी विमानसेवा सुरू झाली. मात्र किंगफिशर कंपनी आर्थिक नुकसानीत आल्याने विमान सेवा बंद पडली आणि तेव्हापासून ती बंदच होती.

हे सुद्धा वाचा

आता या विमानसेवा सुरु होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात 2016 साली सोलापूर विमानतळचे नाव उडान योजनेत समाविष्ट झाले. मात्र जवळ असलेल्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा असल्याचा अहवाल दिल्याने DGCA ने परवानगी नाकारली. अनेक वर्ष हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. मात्र मागच्या वर्षी चिमणी पाडून विमानसेवेचा अडथळा दूर करण्यात आला. मागील वर्षी विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रशासनाने विविध अटी शर्ती पूर्ण केल्यानंतर अखेर प्रवासी विमानसेवेचा परवाना देखील मिळाला आहे. विमानतळच्या उद्घाटनंतर सोलापुरातून विमानसेवा करण्यासाठी विविध कंपनीशी शासन आणि प्रशासनाच्या चर्चा सुरु असून लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सोलापूर-मुंबई, सोलापूर-हैद्राबाद, सोलापूर-तिरुपती या मार्गावर विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.