हिंगोली | 27 ऑगस्ट 2023 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची सभा रविवारी हिंगोलीत झाली. या सभेतून पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र केले. त्यांनी भाजपच्या राजकारणावर जोरदार टीका केली. त्यासाठी त्यांनी भाजप वाढवणाऱ्या कार्यकर्त्यांची आज काय परिस्थिती झाली आहे, हे सांगून भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेतील गद्दारांवर टीका केली. उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण हे भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर केंद्रीत झालेले होते.
शिवसेना २५ ते ३० वर्षे भाजप सोबत युतीत होते. त्यावेळी आमच्यासोबत भाजपचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज आम्हाला किव वाटते. या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी आयुष्य झिजवले. त्यांनी मेहनत करुन भाजप हा पक्ष मोठा केला. परंतु तेच कार्यकर्ते आज उपाशी राहिले असून तूपशी मात्रा आयाराम झाले आहेत. यासाठीच तुम्ही भाजपसाठी मेहनत घेतली होती का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विचारला.
मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते. त्या कार्यकर्त्यांनी रात्रदिवंस मेहनत केली अन पक्ष वाढवला आहे. परंतु त्यांना आज सतरंज्या उचलाव्या लागत आहेत. सरकार आले पण त्यांना काहीच मिळाले नाही. शिवसेना फोडल्यानंतर डबल इंजिन सरकारमध्ये आणखी एक डबा अजित पवार यांचा जुळला आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना काहीच मिळाले नाही. भाजपमध्ये तुम्हाला नेते घडवता येत नाही का? तुमच्या पक्षात नेते नाहीत का? तुम्हाला नेते माझे लागतात. वडील माझेलागतात. त्या दिल्लीच्या वडिलांची काय हिंमत राहिली नाही का? हे नामार्द आहेत. त्यांना स्वत:चे काही विचार नाही. भाजप फक्त कार्यकर्त्यांना वापरून घेते.
पाकिस्तानात असणाऱ्या कुलभूषण जाधव याला सोडवण्यासाठी तुम्ही काय केले? तो पाकिस्तानी तुरुंगातून केव्हा बाहेर येणार आहे. तो तुरुंगात जिवंत आहे की मेला आहे? हे माहीत नाही आणि तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळत आहात, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला.