विठ्ठल देशमुख, प्रतिनिधी, वाशिम : मागील दोन वर्षापासून अत्यल्प दरामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आज चांगली बातमी दिली. बहुतेक सर्वच पिकांच्या हमीभावात ६ते १० टक्क्याने वाढ केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.धानाला २१८३ रुपये हमीभाव मिळणार आहे. आधी २०४० रुपये हमीभाव होता. यात १४३ रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली. कापसाला ७०२० रुपये हमीभाव मिळणार आहे. आधी कापसाचा हमीभाव ६३८० रुपये होता. यात ६४० रुपये प्रतिक्विंटल वाढ झाली आहे. ज्वारी (हायब्रीड)- ३१८० रुपये हमीभाव मिळणार आहे. आधी २९७० रुपये भाव होता. २१० रुपये प्रतिक्विंटल वाढ झाली आहे.
मुगाच्या हमीभावात सर्वाधिक म्हणजे ८०३ रुपये प्रतीक्विंटल वाढ करण्यात आली आहे. मुगाला आधी ७७५५ रुपये हमीभाव होता. आता ८५५८ रुपये हमीभाव करण्यात आला आहे. सर्वात कमी हमीभावात वाढ मक्याला देण्यात आली आहे. १२८ रुपये प्रतिक्विंटल मक्याच्या हमीभावात वाढ झाली आहे.
केंदीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी खरीप हंगाम २०२३-२०२४ साठी विविध पिकांचे हमीभाव जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे ही घोषणा करताना त्यांनी २०१४-१५ च्या हमीभावाशी तुलना करून २०२४ निवडणुकाही डोळ्यासमोर ठेवल्या आहेत. २०२१ च्या हंगामात १० हजाराच्या पार गेलेल्या सोयाबीनला मागील दोन वर्षांपासून अत्यल्प दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. आज जाहीर झालेल्या हमीभावात केंद्र सरकारने मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ३०० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सध्या तुरीच्या दराने ११ हजाराचा टप्पा पार करून नवा उच्चांक गाठला. केंद्र सरकारने दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे यंदा तुरीच्या हमीभावात वाढ होणार नाही असा अंदाज होता. मात्र केंद्र सरकारने यात वाढ करून ७००० रु प्रतिक्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे. मागील वर्षी तुरीच्या ६६०० रुपये हमीभाव होता.