उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज महिलांनी थेट गाभाऱ्यात प्रवेश करत अनेक वर्षांची परंपरा मोडली. या महिलांनी आत प्रवेश करून तुळजाभवानी मातेच्या मूळ मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेतलं. काही महिला मंदिर गाभाऱ्यात प्रक्षाळ पूजेसाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनीही मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेतलं.
पूर्वीपासून तुळजाभवानीच्या मूर्तीला देवीच्या पुजारी शिवाय कुणीही स्पर्श करत नाही. पुरुष भाविकही गाभाऱ्यात जातात. मात्र मूर्तीला स्पर्श फक्त पुजारी करतात. मात्र महिलांनी मूर्तीला स्पर्श केल्याने खळबळ उडाली आहे. पूर्वीपासून महिलांना तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यात जाण्यास आणि अभिषेक पूजा करायला परवानगी होती, मात्र मूर्तीला हात लावण्यास परवानगी नव्हती. आता या मूर्तीला काही महिलांनी हात लाऊन दर्शन घेतल्याने एका नव्या वादाला तोंड फुटलंय.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात देवीच्या मूर्तीला चरणस्पर्श करण्याचा अधिकार अनेक वर्षांपासून तुळजापुरातील सोळा घरे म्हणजेच भोपे पुजारी आणि त्यांच्या घरातील महिलांना होता. इतर महिलांनाही चरण स्पर्श करण्याची इच्छा होती, त्यासंदर्भात तुळजापुरातील साडे तीनशे महिलांनी भूमाता ब्रिगेडकडे तक्रार अर्ज नोव्हेंबर 2018 ला तृप्ती देसाई यांच्या नावे दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या, त्यातून काही मार्ग निघाला नाही, तर सर्व महिलांनी प्रवेश करा, असं तृप्ती देसाईंच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. त्यात काही अडचणी आल्या, तर मी स्वतः प्रवेशाला येईल असं आश्वासनही तृप्ती देसाईंनी दिलं होतं.
“तुळजाभवानी मंदिरात सर्वच महिलांना आजपासून चरणस्पर्श करण्याचा अधिकार कायमस्वरूपी सुरू ठेवावा. आज शेकडो वर्षांची परंपरा या महिलांनी धाडसाने मोडून काढलेली आहे. त्यांचे अभिनंदन, तसेच मंदिराचे ट्रस्टी आणि जिल्हाधिकारी यांनी आजपासून सर्व जाती-धर्माच्या महिलांना चरण स्पर्श करण्याचा अधिकार सुरू ठेवावा”, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी केली.
शबरीमाला मंदिर प्रकरण
नुकतेच महिलांना मंदिर प्रवेश नसणाऱ्या केरळच्या शबरीमाला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश करत दर्शन घेतलं. यामुळे केरळात संघर्ष पेटला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शबरीमाला मंदिरात महिला प्रवेशाचा मार्ग मोकळा झालाय. पण यासाठी अजूनही अनेकांचा विरोध आहे. याच्या निषेधार्थ हिंदुत्वावादी संघटनानी केरळ बंदची हाक दिली होती. आतापर्यंत एकूण 745 जणांना अटक करण्यात आली आहे.
शनी शिंगणापूर प्रकरण
2015 साली शनी शिंगणापूर येथे एका युवतीने चौथाऱ्यावर चढून शनीचं दर्शन घेतलं होतं. यावरुन महाराष्ट्रातही मोठा वाद उफाळून आला होता. शनी मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना जाण्यास बंदी असतानाही या युवतीने थेट चौथाऱ्यावर चढत शनीचं दर्शन घेतलं होतं.
बातमीचा व्हिडीओ :