यवतमाळ : उमरखेड येथील श्री राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सध्या कार्यरत असलेले बालरोग तज्ज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वाराने गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. उमरखेड-पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेल समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञात युवकाने डॉक्टरवर चार गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे उमरखेडच्या शासकीय रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. हनुमंत धर्मकारे मागील 7 वर्षांपासून उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्यांचा उमरखेड बसस्थानकाच्या समोर खाजगी बाल रुग्णालय आहे. गेल्या 7 वर्षाच्या काळात त्यांची कारकीर्द ही अतिशय सर्वसमावेशक राहिलेली आहे. या शिवाय कुठल्याही वादाच्या विषयात त्यांचे नाव चर्चेत आले नाही. असे असताना आज अचानक त्यांच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबार केला यामुळे शहरात चर्चेला पेव फुटले आहे.
शहरातील उत्तरवार रुग्णालयाच्या नजीकच असलेल्या गोरखनाथ हॉटेल येथे चहा पाण्यासाठी बैठक असते. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटर सायकलवरुन ते त्यांच्या खाजगी दवाखानाकडे जात असताना एक अज्ञात युवकाने त्यांच्यावर बंदूक रोखून छातीमध्ये गोळ्या झाडल्या. त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अज्ञात युवक त्याच्या शाईन गाडीने भरधाव वेगाने पसार झाला. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉक्टरला नागरिकांनी उचलून येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
माजी गृह राज्यमंत्री रणजीत पाटील हे मंगळवारी उमरखेडच्या दौऱ्यावर होते. त्यांना या घटनेचे वृत्त कळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत आमदार नामदेव ससाने, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. वातावरण शांत ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
विशेष म्हणजे मागील आठ दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी उमरखेड शहरात तणावग्रस्त स्थिती आहे. यामुळे उमरखेड पोलीस बंदोबस्तात असताना भर रस्त्यात हा गोळीबार झाल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था यावर सामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. (Unidentified youth shoots government medical officer in Yavatmal)
इतर बातम्या