श्रीनगर : अमरनाथ यात्रे (Amarnath Yatra)दरम्यान सोमवारी महाराष्ट्रातील 50 वर्षीय यात्रेकरू (Pilgrims) 100 फूट खाली कोसळला. लष्कराने जम्मू-काश्मीरमधील बारारीमार्ग हेलिपॅडवरून गंभीर जखमी (Injured) झालेल्या त्या यात्रेकरूला विमानातून बाहेर काढले. हा यात्रेकरु महाराष्ट्राच्या अकोला येथील असून सत्यनारायण तोष्णेय असे त्यांचे नाव आहे. सत्यनारायण यांचा तोल गेला आणि ते 100 फूट खाली नदीत कोसळले. सत्यनारायण हे आपल्या मुली आणि पत्नीसह पोनीवर दर्शन घेऊन पवित्र गुहेतून परतत होते. ब्रिमार्गजवळ पोनी असंतुलित झाला आणि सत्यनारायण हे नदीच्या दिशेने सुमारे 100 फूट खाली पडले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून छातीत फ्रॅक्चर झाल्याचे संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले. या घटनेने अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे वृत्त समजताच लष्कराच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी मोबाईल बचाव पथकांसह युद्धपातळीवर बचावकार्य सुरु केले. जवानांनी खाली कोसळलेल्या सत्यनारायण यांना एअरलिफ्ट करून सुरक्षितरित्या बाहेर काढले. सुरुवातीला सत्यनारायण यांना बारारीमार्ग येथील आर्मी मेडिकल येथे हलवले. यावेळी एमएपी येथे प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर तातडीने हेलिकॉप्टर बोलावण्यात आले आणि त्याद्वारे बारारीमार्ग येथे नेण्यात आले. जखमी सत्यनारायण यांच्यासोबत त्यांच्या मुली आणि पत्नी आहेत. जखमी सत्यनारायण यांना पुढील उपचारासाठी श्रीनगरला रेफर करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन वर्षांच्या कालावधीनंतर अमरनाथ यात्रा गेल्या आठवड्यात सुरू झाली आहे. या यात्रेवर पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडून हल्ले केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. मागील काही दिवसांत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे काही मनसुबे उधळून लावण्यात यश मिळवले आहे. याचदरम्यान सतर्क असलेल्या सुरक्षा यंत्रणा भाविकांची विशेष काळजी घेत आहेत. अमरनाथ यात्रेला टार्गेट करण्यासाठी जवळपास 150 दहशतवादी सीमेपलीकडे आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दल पूर्ण सतर्क आहेत. सुरक्षा दलांनी खोऱ्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांचा डाव वेळीच हाणून पाडला आहे. अमरनाथ यात्रेसाठी सर्व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच गावकऱ्यांनी लश्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ते दहशतवादी अमरनाथ यात्रेत घातपात करण्याच्या तयारीत होते. (Amarnath pilgrims from Maharashtra fell 100 feet down the mountain)