महाराष्ट्रात ED, पश्चिम बंगालमध्ये CBI च्या धाडी, निवडणुकीपूर्वी वातावरण तापलं

| Updated on: Dec 31, 2020 | 1:48 PM

महाराष्ट्रात जसं ED नोटीसने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे, तसं तिकडे कोलकात्यात CBI धाडींनी वाद पेटला आहे.

महाराष्ट्रात ED, पश्चिम बंगालमध्ये CBI च्या धाडी, निवडणुकीपूर्वी वातावरण तापलं
प्रातिनिधिक फोटो - cbi
Follow us on

कोलकाता : विधानसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election 2021) मोठं घमासान पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात जसं ED नोटीसने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे, तसं तिकडे कोलकात्यात CBI धाडींनी वाद पेटला आहे. सीबीआयने गुरुवारी कोलकात्यातील तृणमूल यूथ काँग्रेसचे (Trinamool Youth Congress) जनरल सेक्रेटरी विनय मिश्रा (Vinay Mishra) यांच्या कार्यलयांवर धाडी टाकल्या. विनय मिश्रा हे तृणमूल काँग्रेसचे बडे नेते अभिषेक बॅनर्जी यांचे जवळचे मानले जातात. ( CBI raids TMCs Vinay Mishras Kolkata residences at West Bengal)

सीबीआयच्या म्हणण्यानुसार “विनय मिश्रा यांना सातत्याने नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं”.

सीबीआयची टीम गुरुवारी कोलकात्यात पोहोचली. या टीमने आपला मोर्चा थेट विनय मिश्रा यांच्या कार्यालयांकडे वळवला. कोळसा चोरी प्रकरण आणि पशुपालनासंदर्भातील घोटाळाप्रकरणात हे धाडसत्र असल्याचं सांगण्यात येत आहे.

वाचा :  ममतांच्या आमदारांची फोडाफोडी, मराठी नेत्यांवर विशेष जबाबदारी, भाजपचं ‘मिशन बंगाल’ नेमकं काय?

याशिवाय सीबीआयने कोळसा तस्करीप्रकरणात हुगळी जिल्ह्यात धाडी टाकल्या. सीबीआयने अमित सिंह आणि नीरज सिंह या भावांवर छापेमारी केली. दोघांच्या घरातील कागदपत्र आणि दस्तऐवज सीबीआयने तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. महत्त्वाचं म्हणजे सीबीआयच्या या धाडीवेळी केंद्रीय सुरक्षा पथकाचे जवान हे अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवत होते.

भाजपची प्रतिक्रिया

सीबीआयच्या या धाडीनंतर भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी प्रतिक्रिया दिली. “बंगालचे पॉवर ब्रेकर विनय मिश्रा यांच्यावर सीबीआयची धाड पडली. त्यानंतर बंगालमधील बड्या अधिकाऱ्यांची आपत्कालिन बैठक आणि मुख्यमंत्र्यांच्या गोटातही हालचाली हा राज्यातील चर्चेचा विषय आहे” असं विजयवर्गीय म्हणाले.

भारत आणि बांगलादेश सीमेवर पशू आणि विशेषत: गायींच्या तस्करीचा मुद्दा (मवेशी तस्करी) आहे. यामध्ये स्थानिक अधिकारी, नेते सहभागी असल्याचा आरोप आहे. याप्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने यापूर्वी याच प्रकरणात अनेक BSF अधिकाऱ्यांनाही समन्स पाठवून, चौकशी केली होती.

( CBI raids TMCs Vinay Mishras Kolkata residences at West Bengal)

संबंधित बातम्या 

ममतांच्या आमदारांची फोडाफोडी, मराठी नेत्यांवर विशेष जबाबदारी, भाजपचं ‘मिशन बंगाल’ नेमकं काय?   

पश्चिम बंगालमध्येही भाजपची ‘मेगाभरती’!, ममतांचे अनेक दिग्गज भाजपात दाखल