अहमदाबाद | 10 फेब्रुवारी 2024 : टीव्ही9 नेटवर्क आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन्स इन नॉर्थ अमेरिका (AIANA)ने अहमदाबादमध्ये प्रवासी गुजराती पर्वाचं आयोजन केलं आहे. या पर्वानिमित्ताने देशच नव्हे तर जगभरातील नामांकित आणि विविध क्षेत्रातील गुजराती लोक एवटले आहेत. जगभरात विखुरलेले गुजराती लोक पुन्हा एकदा एकाच छताखाली एकत्र आले असून या पर्वाला जल्लोषात सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या भाषणाने या मुख्य सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री पटेल यांनी टीव्ही9 नेटवर्कचं तोंडभरून कौतुक केलं. तसेच सक्सेसफूल गुजराती हस्तींना एकाच छताखाली आणल्याबद्दल आभारही मानले. तसेच स्वातंत्र्याच्या काळात जसे सरदार पटेल आणि महात्मा गांधी या दोन गुजराती नेत्यांनी देशाला योगदान दिलं, तसंच योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोन्ही गुजराती नेते देत आहेत, असं मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले.
स्वातंत्र्य काळात दोन गुजराती सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांनी देशाला मोठं योगदान दिलं. त्यांनी गुजरातचीही शान वाढवली. स्वातंत्र्य काळात जसे पटेल आणि गांधी होते, तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. हे दोन्ही नेतेही देश आणि गुजरातचा लौकीक वाढवत आहेत. आज आपण सर्व एकत्र आलो आहोत, हे त्यांच्या मेहनतीचंच फळ आहे. भारताचा विकास करणं हे महाकठिण काम असल्याचं पूर्वी वाटत होतं. पण एका व्यक्तीने गेल्या 10 वर्षात प्रचंड कामे करून हा समज खोटा ठरवलाच, पण देशाचा गौरवही वाढवला. आता परदेशात जायचं असेल आणि व्हिसा कार्यालयातून पासपोर्ट मिळाला तर पूर्वीपेक्षा आता प्रचंड अभिमान वाटतो. राम मंदिर उभारून देशाचा पुन्हा एकदा गौरव वाढवण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले.
आपण जी-20 मधून वसुधैव कुटुंबकमची संस्कृती देशभरात प्रस्थापित करू शकलो आहे. कोरोनाकाळात आपण कुणावर अवलंबून नाही आणि कुणाच्या मार्गावर जाण्याची गरज नाही, हे भारताने दाखवून दिलं आहे. आपणच आपली कोरोनावर मात करणारी लस शोधून काढली. आपला भारत आत्मनिर्भर बनला आहे, असंही मुख्यमंत्री पटेल म्हणाले.
तुम्ही आता जसे भारतात यायला आतूर आहात, तसेच प्रभू राम जेव्हा श्रीलंकेत गेले होते, तेव्हा तेही तुमच्यासारखेच भारतात यायला आतूर झाले होते. विदेशातून येणाऱ्या भारतीयांच्या मनात आजही तिच भावना असते. आपली जन्मभूमी, आपली मातृभूमीवरील निस्सीम प्रेम परदेशातून आलेल्या या भारतीयांमध्ये ठासून भरेललं असल्याचं पाहायला मिळत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आता गुजरातमध्ये जे काही होतंय ते वर्ल्ड क्लासच होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्हिजन स्पष्ट आहे. आज देश आणि विदेशातील लोक गुजरातमध्ये रणोत्सवाला येतात. 2006मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छमध्ये रण उत्सव सुरू केला. तेव्हापासून देशविदेशातील लोक या उत्सवात सामील होत आहेत. कच्छला त्यामुळे नवी ओळख मिळाली आहे. मोदींच्या व्हिजनमुळेच हे शक्य झाल्याचंही त्यांनी सांगितलं.