इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, टेक ऑफ दरम्यान इंजिनमधून निघाला स्पार्क
इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. याबद्दल कंपनीने निवेदन जारी करून घटनेची माहिती दिली आहे.
नवी दिल्ली, दिल्लीहून बेंगळुरूला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे (Indigo Flight Emergency Landing) इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. उड्डाण सुरू असतानाच विमानातून ठिणग्या निघत असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यामुळे तातडीने विमान थांबवावे लागले. इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात याबद्दल माहिती दिली आहे. सध्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. हे विमान पुन्हा कधी उड्डाण करू शकतील याबाबत अद्याप कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. त्या व्हिडिओमध्ये विमान टेक ऑफ करण्यासाठी धावपट्टीवर धावत असताना अचानक एक ठिणगी उठते आणि त्यानंतर आगीच्या ज्वाळांना सुरुवात होते. हे पाहताच पायलट धावपट्टीवरच विमान थांबवतो. यानंतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले जाते.
कोणत्या विमानात झाला बिघाड
गेल्या काही महिन्यांत देशात अनेक वेळा विमानांचे इमर्जन्सी लँडिंग झाले आहे. बहुतेक घटना स्पाइसजेटसोबत घडल्या आहेत, पण आता इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांमध्येही तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. अपघात झालेल्या विमानाचा क्रमांक 6E-2131 आहे. जारी केलेल्या निवेदनात, विमान कंपनीने म्हटले आहे की तांत्रिक बिघाडामुळे विमान थांबवावे लागले. सध्या विमान कंपनीकडून प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. इंडिगोने या घटनेबद्दल प्रवाशांची माफी मागितली आहे.
काही दिवसांआधीच घडली होती अशी घटना
तसे, काही दिवसांपूर्वी स्पाइसजेटच्या विमानातही असाच तांत्रिक बिघाड आढळून आला होता. स्पाइसजेटच्या विमानाने गोव्याहून हैदराबादला उड्डाण केले. हे विमान हैदराबादला पोहोचले होते आणि पायलट उतरण्याच्या तयारीत होते. मात्र त्यानंतर अचानक संपूर्ण विमान धुराने भरले. यामुळे पायलटला तातडीने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. इमर्जन्सी लँडिंगच्या वेळी विमान कंपनीने त्यांना ऑक्सिजन मास्कही दिला नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता.