उठसूट रोज मशि‍दीखाली मंदिराचा दावा करून कसं चालणार? देशाच्या बदनामीचा विचार करणार की नाही, कट्टर हिंदू संघटनांचे सरसंघचालकांनी टोचले कान

| Updated on: Dec 21, 2024 | 3:15 PM

Mohan Bhagwat on Mandir Masjid Row : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या विधानाने सगळेच हैराण झालेत.

उठसूट रोज मशि‍दीखाली मंदिराचा दावा करून कसं चालणार? देशाच्या बदनामीचा विचार करणार की नाही, कट्टर हिंदू संघटनांचे सरसंघचालकांनी टोचले कान
डॉ. मोहन भागवत
Follow us on

आजकाल कुठे ना कुठे एखाद्या मशिदीखालून किंवा दर्ग्याच्या खालून मूर्ती प्रकट होत आहे. लगेचच काही हिंदू नेते त्या मशीद किंवा दर्ग्याचे उत्खनन करून घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करतात. त्यावर न्यायालयही ऑर्डर देतं. यानंतर विहिरींमध्ये मंदिराचा ढिगारा किंवा मूर्ती पडल्याच्या कथा लोकांमध्ये पसरू लागतात. त्यामुळे त्या भागातील शांतते मिठाचा खड़ा पडतो आणि वातावरण बिघडतं. विशेषत: उत्तर प्रदेशात सध्या असंच वातावरण आहे. खरंतर त्यावर अंकुश ठेवण्याचं काम हे पोलिसांचं आहे, पण ते गप्प असतात. सरकारची ही उदासीनता पाहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी अशा कारवायांवर जोरदार भाष्य केले. कोणत्याही प्रार्थनास्थळांखाली हिंदू मंदिरे असण्याचा दावा करणे स्वीकारहार्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. काही हिंदू नेत्यांच्या आक्रमकतेमुळे देशाची बदनामी होत असल्याचा इशारा त्यांनी दिला.

हिंदूनी बंधुभावाची प्रतिमा जपावी

गुरूवारी 19 डिसेंबर रोजी पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहजीवन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी सरसंघचालक बोलत होते. काही स्वयंघोषित हिंदूंनी अनावश्यक हिंदू-मुस्लिम संघर्ष निर्माण करणे टाळावे. हिंदू परंपरेने उदार आणि सहिष्णू आहेत. आपल्या या परंपरेला धक्का पोहोचेल असा कोणताही वाद निर्माण करणं आपण आता टाळलं पाहिजे, असे ते म्हणाले. मात्र मोहन भागवत यांच्या या विधानानंतर हिंदू संघटनांमध्ये खळबळ माजली आहे. प्रत्येक मशिदीखाली मंदिर असल्याचा दावा करणाऱ्यांना अस वाटतंय की भागवत आपला प्रचार उधळून लावत आहेत. पण अशा कृतींनी हिंदू समाज किती काळ आपली ताकद टिकवून ठेवणार हाही खरा प्रश्न आहे. जगभरात हिंदूंना आपली सद्भावनेची प्रतिमा कायम ठेवली पाहिजे, त्यामुळे संयम राखणे आवश्यक असल्याचे भागवत यांनी एकाप्रकारे स्पष्ट केलंय.

मुस्लिम राज्यकर्त्यांनी गोहत्येवर घातली बंदी

मुघल औरंगजेबाने निरंकुश पद्धतीने राज्य केले तरी त्याचा वंशज बहादुर शाह जफर याने गोहत्येवर बंदी घातली होती, असे विधान डॉ. मोहन भागवत यांनी पुण्यातील हिंदू सद्भावना समारोहात केलं. इथेच कधीच कोणाला परकं समजलं जात नाही आणि हेच हिंदूंच वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या भाषणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. भागवत हे स्वत: हिंदूवादी नेते असताना ते असं विधान कसं करू शकतात ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यांच्या विधानाने अनेक जण हैराण झाले आहेत. पण आपण हिंदू परंपरेचा इतिहास नीट समजून घेतला तर आपल्या हे लक्षात येईल की हिंदू समाजाने कधीही दुसऱ्या धर्मातील व्यक्तीला भेदभावाची वागणूक दिली नाहीये. हिंदू धर्माची ही परंपरा कायम राहिली पाहिजे, असे डॉ. भागवत म्हणाले.

राम मंदिराबाबत काय म्हणाले सरसंघचालक ?

पुण्यातील या व्याख्यानमालेत डॉ.भागवत म्हणाले, दररोज कोणता- ना कोणता वाद समोर येतोय पण ते योग्य नाही.  धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाली. त्या मंदिराशी कोट्यवधी हिंदूच्या भावना जोडलेल्या होत्या. राम मंदिराची निर्मिती व्हावं असं हिंदूंना वाटत होतं, ते हिंदूंचं श्रद्धास्थान आहे. मात्र, मंदिराची निर्मिती झाली म्हणून कोण हिंदूंचा नेता होत नाही, असं विधान सरसंघचालकांनी केलं होतं. आता मंदिराची निर्मिती झाली आहे, त्यामुळे आता मंदिर-मशिदीवरून कोणताही वाद उभा करायचा नाहीये. आपण एकत्र , एकदिलाने राहू शकतो, हे भारताने दाखवून देण्याची वेळ आहे. अलीकडे अनेक मशिदींखाली मंदिरांचे अवशेष सापडल्याचे म्हटले जात आहे, त्यासाठी काही लोक न्यायालयातही जातात. ते न्यायालयातही याचिका दाखल करतात. असं करून आपण हिंदू नेता बनू असं काहींना वाटतं, पण असा विचार योग्य नाही, असेही सरसंघचालकांनी नमूद केलं.