Loksabha Election 2024 | आघाडीच्या बोलणीआधीच या पक्षाकडून 16 उमेदवारांची यादी जाहीर
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी आणि पंजाबमधील आप या दोन्ही पक्षांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारीच भाजपच्या सहकार्याने पुन्हा सत्ता स्थापन केली. या धक्यातून इंडिया आघाडी आणि कॉंग्रेस सावरत नाही तोच...
उत्तर प्रदेश | 30 जानेवारी 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली आहे. यावेळची निवडणूक ही प्रामुख्याने इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. जागावाटपाची बोलणीही झालेली नाही. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी आणि पंजाबमधील आप या दोन्ही पक्षांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारीच भाजपच्या सहकार्याने पुन्हा सत्ता स्थापन केली. या धक्यातून इंडिया आघाडी आणि कॉंग्रेस सावरत नाही तोच इंडिया आघाडीतील एका प्रमुख पक्षाने कॉंग्रेसला मोठा धक्का दिला आहे.
उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाने राज्यातील लोकसभेच्या 80 पैकी 18 जागा मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदलाला (आरएलडी) देण्याची ऑफर दिली होती. मात्र, ही ऑफर चालली नाही. या दोन्ही पक्षांनी आपापल्या ताकदीच्या जोरावर अधिक जागांची मागणी केली होती. पण, हा फौर्म्युला निश्चित होण्याआधीच समाजवादी पार्टीने 16 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
समाजवादी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेसला ११ जागा आणि आरएलडीला सात जागा देण्याचे सांगितले आहे. 2009 मध्ये जिंकलेल्या 21 जागांपेक्षा जास्त जागा द्याव्यात, अशी काँग्रेसची मागणी आहे. तर, आरएलडीला राज्यात 7 ऐवजी 8 जागांवर निवडणूक लढवायची आहे.
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश कुमार यादव यांनी 16 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात त्यांची पत्नी डिंपल यादव यांचाही समावेश आहे. मैनपुरीतून डिंपल यादव यांना तिकीट देण्यात आले आहे. संभलचे विद्यमान खासदार शफीकुर रहमान वर्क यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. आंबेडकर नगरमधून लालजी वर्मा, फिरोजाबादमधून अक्षय यादव, एटामधून देवेश शाक्य, बदायूंमधून धर्मेंद्र यादव, खेरीमधून उत्कर्ष वर्मा, धौराहारामधून आनंद भदौरिया, उन्नावमधून अनु टंडन आणि लखनऊमधून रविदास मेहरोत्रा हे लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
Samajwadi Party (SP) announces the names of 16 candidates for the upcoming Lok Sabha elections 2024.
Dimple Yadav to contest from Mainpuri, Shafiqur Rahman Barq from Sambhal and Ravidas Mehrotra from Lucknow. pic.twitter.com/sEmTuO84Nw
— ANI (@ANI) January 30, 2024
बांदामधून शिवशंकर सिंह पटेल, अकबरपूरमधून राजाराम पाल, फारुखाबादमधून डॉ. नवलकिशोर शाक्य, बस्तीमधून रामप्रसाद चौधरी, फैजाबादमधून अवधेश प्रसाद आणि गोरखपूरमधून काजल निषाद अशी अन्य उमेदवारांची नावे आहेत. विशेष म्हणजे महाआघाडीचा प्रमुख घटक असलेल्या काँग्रेससोबत जागावाटपाची कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नसताना सपाने ही यादी जाहीर केली आहे.
सोनिया गांधी कॉंग्रेसच्या एकमेव खासदार
राजकीय दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत. देशात लोकसभेच्या निवडणुका या वर्षी एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे 64 खासदार आहेत. याशिवाय बसपचे 10, सपाचे तीन आणि अपना दल (सोनेलाल) चे दोन खासदार आहेत. रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सोनिया गांधी या राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार आहेत.