जयपूर: दिव्यदृष्टीने पाहिजे त्या गोष्टी ओळखतो, असा दावा करणारे बागेश्वर बाबा सध्या भलतेच चर्चेत आहेत. त्याला कारणही तसंच आहे. त्यांनी नागपूरमध्ये येऊन आपला दरबार भरवला. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी त्यांना थेट चमत्कार सिद्ध करण्याचं आव्हानच दिलं. चमत्कार करून दाखवला तर 30 लाख रुपयांचं बक्षीस देऊ असं श्याम मानव म्हणाले. बागेश्वर बाबांनीही हे आव्हान स्वीकारलं आहे. पण त्यांनी एक अट ठेवलीय. ते म्हणजे मी नागपूरला येऊन चमत्कार करून दाखवणार नाही. तर रायपूरला तुम्हालाच यावं लागेल, असं या बाबाने म्हटलंय. त्यामुळे बागेश्वर बाबा अधिकच चर्चेत आले आहेत. कोण आहेत हे बागेश्वर बाबा? त्याचा घेतलेला हा धांडोळा…
छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर दाम हनुमान मंदिरात रोज हजारो भाविक येत असतात. याच धामचे पुजारी आणि कथावाचक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री अचानक प्रसिद्धीस आले आहेत. हेच पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजे बागेश्वर बाबा होय.
बागेश्वर बाबांचा जन्म 4 जुलै 1996मध्ये झाला. छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात बागेश्वर बाबांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामकृपाल गर्ग आणि आईचे नाव सरोज गर्ग आहे. त्यांना तीन मुलं आहेत. त्यामध्ये बागेश्वर हे सर्वात मोठे आहेत. बागेश्वर यांचं बालपण गरीबीत गेलं.
बागेश्वर उर्फ धीरेंद्र कृष्ण यांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यांनी हळूहळू वडिलांप्रमाणेच कथा वाचण्यास सुरुवात केली. माझे वडील मला शिक्षणासाठी वृंदावनला पाठवू शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे त्यावेळी एक हजार रुपये नव्हते, असं बागेश्वर बाबा सांगतात.
त्यांच्या गावात हनुमानाचं मंदिर आहे. याच बालाजी मंदिरात त्यांचे आजोबा भगवानदास गर्ग यांची समाधी आहे. त्यांचे आजोबा सिद्धपुरुष होते. आजोबांचा आशीर्वाद आणि तपश्चर्येमुळे आपल्यालाही भविष्य सांगण्याची सिद्धी प्राप्त झाल्याचा त्यांचा दावा आहे.
बागेश्वर बाबा आपल्या दरबारात कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बोलावतात, तो व्यक्ती जवळ येईपर्यंत त्याचं नाव, पत्ता एका चिठ्ठीवर लिहून देतात. एवढेच नव्हे तर भर दरबारात बाबा त्या व्यक्तिच्या समस्याही सांगतात, असा दावा बागेश्वर बाबांचे भक्त करतात.
त्यांच्या या दाव्यामुळेच ते सातत्याने वादात असतात. आता श्याम मानव यांनीही त्यांना हा चमत्कार सिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे. हा चमत्कार सिद्ध केल्यास 30 लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं आव्हान दिलं आहे.