Sanjay Raut : भाजपसोबत जाताच दाऊदशी संबंधित प्रॉपर्टी आठव्यादिवशी मुक्त, राऊतांचा ‘या’ नेत्यावर निशाणा
Sanjay Raut : "तुम्ही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चौथ्या दिवशी एक हजार कोटीची संपत्ती मोकळी केली जाते. आठ दिवस जरा थांबा, लोकांना विसरु द्या. निर्लज्जपणाचा हा कारभार सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्ष का सोडला? याच भितीपोटी सोडला" असा दावा संजय राऊत यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांना काल मोठा दिलासा मिळाला. अजित पवार यांची आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आली. आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत त्याच मुद्यावरुन भाजपवर निशाणा धाला. “पार्थ पवार यांचं मी खास अभिनंदन करतो महाराष्ट्रात अनेक आमच्या सहकाऱ्यांच्या अशा प्रकारच्या प्रॉपर्टीवर ईडीने टाच आणली. पण ते फक्त भाजपला शरण गेले नाहीत, म्हणून त्यांच्या प्रॉपर्टी या मुक्त केल्या नाहीत. मला वाटत लवकरच नवाब मलिक यांची सुद्धा प्रॉपर्टी सोडवली जाईल” असं संजय राऊत म्हणाले.
“माझ स्वत:च राहत घर ईडीने ताब्यात घेतलय. गावची वडिलोपार्जित 40 गुंठे जमीन ईडीच्या ताब्यात आहे. आम्ही त्यांना सांगतोय, हे आमच्या अधिकृत, कष्टाच्या पैशातून घेतलेली जागा जमीन आहे, ही आम्हाला मुक्त करुन द्यावी. पण, नाही आमच्यावर दबाव टाकला, तुम्ही पक्ष सोडलात, तर तुमचं जप्त केलेलं घर मोकळं करु, पण आम्ही हे करायला नकार दिला” असा संजय राऊत यांनी दावा केला.
वॉशिंगमशीनमध्ये धुवून प्रॉपर्टी मोकळी केली
“प्रफुल पटेल हे भाजपसोबत जाताच आठव्या दिवशी त्यांची दोनशे ते अडीचशे कोटींची प्रॉपर्टी मोकळी केली. दाऊदशी संबंधित असलेली प्रफुल पटेल यांची ही प्रॉपर्टी आहे. दाऊदशी व्यवहार आहे. ईडीने जप्त केलेली ही प्रॉपर्टी आठव्या दिवशी मोकळी केली. त्याविषयी आम्हाला असूया नाही. एकतर तुम्ही खोटे खटले दाखल केले. वॉशिंगमशीनमध्ये टाकून त्यांना धुतलं व त्यांची प्रॉपर्टी मोकळी केली” असा संजय राऊत यांनी निशाणा साधला.
‘त्यासाठी भाजपमध्ये प्रवेशासाठी भाग पाडू नका’
“मी दादांच अभिनंदन करतो, ते अस्वस्थ, तणावाखाली होते, हजारो कोटींची प्रॉपर्टी जप्त केल्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला. वडिलासमान काकांच्या पाठित खंजीर खुपसावा लागला. आता विधानसभेत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसेल, याबद्दल आनंद आहे” असं संजय राऊत म्हणाले. “देशभरात अशा प्रकारच्या कारवाईतून ईडीने जप्त केलेली संपत्ती ती सुद्धा सपंत्ती काळजीपूर्वक मोकळी करावी, त्यासाठी भाजपमध्ये प्रवेशासाठी भाग पाडू नका” असं संजय राऊत म्हणाले.