बीड (परळी) : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. ही निवडणुक दिग्गजांनी प्रतिष्ठेची केलीय. विशेषतः परळीतील मुंडे बहीण भावाचं गाव असणाऱ्या नाथरा ग्रामपंचायतीकडे सर्वांचं विशेष लक्ष आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही प्रचारात उतरले आहेत.
परळी तालुक्यातील नाथरा ही दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जन्मभूमी आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे याचं हे गाव आहे.
या निवडणुकीत पहिल्यांदाच दोघांचेही फोटो एकाच बॅनरवर पहायला मिळाले होते. त्यामुळे राज्यात याची चर्चा केली गेली. सरपंच पदासाठी मुंडेंचे चुलत भाऊ अभय मुंडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
सरपंच पदाची निवडणूक भावा-बहिणीने बिनविरोध होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गौतम आदमाने यांनी त्यांना निवडणुकीत आवाहन दिले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनलीय.
मागील दोन टर्म पासून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात नाथरा ग्रामपंचायत आहे. नऊ पैकी आठ सदस्य हे बिनविरोध निवडून आलेत. यात भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे पाच उमेदवार आहेत.
सरपंच पदासाठी दोन्ही गटात एक मत असले तरी वंचितच्या उमेदवारामुळे इथे सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक आता प्रतिष्ठेची बनलीय. या दोघांनीही प्रचाराचा धडाका सुरूच ठेवलाय.
राज्यातील 7751 ग्रामपंचायतींसाठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.
राज्यातील अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, दोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील गावांमध्ये या निवडणुका पार पडतील.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, आष्टी, बीड, धारुर, गेवराई, केज, माजलगाव, परळी, पाटोदा, शिरूर कासार, वाडवणीत ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत.