नांदेडमध्ये लोकसभेसाठी ‘भावोजी विरुद्ध मेहुणा’ लढत?
नांदेड : लोकसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. अनेक संभाव्य उमेदवारांनी तयारीही सुरु केली आहे. नांदेडमध्येही अशीच काहीशी स्थिती आहे. नांदेडमधून काँग्रेसकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना त्यांचेच मेहुणे म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर हे आव्हान देण्यासाठी सज्ज झाले आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून भास्करराव पाटील खतगावकर हे […]
नांदेड : लोकसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. अनेक संभाव्य उमेदवारांनी तयारीही सुरु केली आहे. नांदेडमध्येही अशीच काहीशी स्थिती आहे. नांदेडमधून काँग्रेसकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना त्यांचेच मेहुणे म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर हे आव्हान देण्यासाठी सज्ज झाले आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून भास्करराव पाटील खतगावकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. तर तिकडे काँग्रेसकडून विद्यमान खासदार असलेल्या अशोक चव्हाण यांची उमेदवारीही जवळपास निश्चित आहे.
भास्करराव पाटील खतगावकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मात्र, आता ते निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे सख्खे मोठे मेहुणे असलेल्या खतगावकर यांनी आज आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला जिल्ह्याभरातील समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने खतगावकरांच्या मेळाव्याला मोठं महत्त्व आलं असून, तशी जिल्ह्याभरात चर्चा सुद्धा सुरु झाली आहे.
आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे पक्षाकडे (भाजप) आपण सांगितलं आहे. त्यामुळे पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक लढवू., असे खतगावकर यांनी सांगीतलं. त्यामुळे आगामी निवडणुकीत मेहुण्या-भावोजीची रंगतदार लढाई पहायला मिळण्याची शक्यता आहे.
कोण आहेत अशोक चव्हाण?
अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे ते पुत्र होय. 2014 साली कथित मोदी लाटेदरम्यान राज्यात काँग्रेसच्या दोनच जागा आल्या. त्यात एक अशोक चव्हाणांची नांदेडमधून आली. अशोक चव्हाण हे सध्या महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहे.
कोण आहेत भास्करराव पाटील खतगावकर?
भास्करराव पाटील खतगावकर हे भाजपचे वरिष्ठ नेते असून, प्रदेश उपाध्यक्ष आहेत. तीनवेळा खासदार आणि तीनवेळा आमदार राहिलेले खतगावकर हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे आहेत. मात्र, सध्या खतगावकर आणि अशोक चव्हाण हे कट्टर विरोधक मानले जातात.