मुंबई : मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक हे शिंदे गट आणि भाजपात (BJP) प्रवेश करत आहेत. मात्र बुलडाण्यात (Buldana) ठाकरे गटाने भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. बुलडाण्यातील भाजप कार्यकर्ते आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हे कार्यकर्ते हाती शिवबंध बांधणार आहेत. केवळ भाजपच नाही तर जिल्ह्यातील राष्ट्रवादी (NCP) आणि वंचित बहुजन आघाडीचे देखील काही कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघातील हे कार्यकर्ते आहेत. तसेच आज बुलडाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांची बैठक देखील मातोश्रीवर होणार आहे.
दरम्यान आजा मातोश्रीवर बुलडाण्यातील शिवसैनिकांची बैठक देखील होणार आहे. जूनमध्ये शिवसेनेचे आमदार फुटले, जुलैमध्ये खासदार फुटले. मात्र जिल्ह्यात शिवसेनेचं संघटनात्मक कार्य सुरूच आहे. अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा होती. आज सुदैवाने वेळ जुळून आली. आज निमित्त देखील आहे. भाजप, राष्ट्रवादी, आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आलेल्या कार्यकर्त्यांनी दिली.
दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.