रुपालीताई प्लीज मला घेऊन चला, वर्ध्याच्या भाजप खासदाराच्या सुनेची विनवणी, कुटुंबाकडून मारहाण?

| Updated on: Sep 08, 2021 | 10:29 AM

वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या सुनेने गंभीर आरोप केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावा आहे.

रुपालीताई प्लीज मला घेऊन चला, वर्ध्याच्या भाजप खासदाराच्या सुनेची विनवणी, कुटुंबाकडून मारहाण?
रामदास तडस यांच्या सून आणि रुपाली चाकणकर
Follow us on

मुंबई : वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस (BJP MP Ramdas Tadas) यांच्या सुनेने गंभीर आरोप केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावा आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी रडत रडत व्हिडीओ शूट करुन राष्ट्रवादीकडे मदत मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे त्यांनी मदतीची याचना केली आहे.

तडस कुटुंब मारहाण करत असल्याचा आरोप आहे. सुनेनं बनवलेला व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला. तसंच
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी पूजाच्या संरक्षणासाठी पोहोचल्या आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी ट्विटद्वारे दिली.

पूजा तडस यांनी व्हिडीओत नेमकं काय म्हटलंय?

रुपाली चाकणकर यांनी आपल्या स्वत:च्या अकाऊंटवरुन व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांचा असल्याचा दावा चाकणकर यांचा आहे. हा केवळ 12 सेकंदांचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओतील महिला म्हणते, “मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते”

रामदास तडस यांना अटक करा : रुपाली चाकणकर

मला आज सकाळी लवकरच पूजाचा फोन आला. फोनवर त्या रडत होत्या. माझ्याकडे मदतीची मागणी त्या करीत होत्या. त्यानंतर मला त्यांनी सविस्तर प्रकरण सांगितलं. गेले अनेक दिवस रामदास तडस, त्यांचा मुलगा आणि तडस कुटुंबीय तिला मारहाण करत आहेत. तिच्या जीवाला धोका असल्याचं तिने मला सांगितलं. तसंच मला इथून घेऊन चला, अशी विनवणी तीने माझ्याकडे केली आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांच्या मदतीसाठी तत्काळ रवान झाले आहेत. त्यांची सर्वोतोपरी मदत केली जाईल. यासंदर्भात नागपूर पोलीस आयुक्तांशी माझं बोलणं सुरु आहे. सरकार आणि पोलिसांच्या वतीने देखील तत्काळ अॅक्शन घेतली जाईल…

परंतु झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. रामदास तडस आणि कुटुंबीयांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केलीय.

खासदार रामदास तडस यांची प्रतिक्रिया

दरम्यान, खासदार रामदास तडस यांनी टीव्ही 9 मराठीकडे आपली प्रतिक्रिया दिली.

माझा मुलगा पंकज आणि पूजाचं लग्न झालं. लग्नाच्या सहा महिन्यानंतर दोघेही वर्ध्याला राहू लागले. काही काळानंतर पूजा माझ्या घरी राहायला आली. दरम्यानच्या काळात पंकज आणि पूजाचं भांडण झालं होतं. माझ्या वडिलांना न विचारता आपण लग्न केलंय. त्यावेळी आपलं असं ठरलं होतं की आपण वर्ध्याला रहायचं. मग आता तू त्यांना त्रास द्यायला त्यांच्याकडे का गेली, असं पंकजने पूजाला विचारलं.

ही भांडणं सुरु असताना मी वर्ध्याला होतो. मला घरुन फोन येताच मी तत्काळ पोलिसांना फोन लावून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी भांडणं सोडवली. मी देखील वर्ध्याहून घरी पोहोचलो. तोपर्यंत पंकज वर्ध्याला निघून गेला होता… त्यानंतर पूजा माझ्याजवळ 2 महिने राहिले. पण मी एकेदिवशी तिला सांगितलं की, अशी रुसून तू इथे किती दिवस राहणार आहे, तू पंकजकडे वर्ध्याला जायला हवं.

कोण आहेत रामदास तडस?

  • रामदास तडस हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत
  • रामदास तडस वर्धा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात
  • या मतदारसंघात रामदास तडस यांचा दबदबा आहे
  • राजकारणात येण्यापूर्वी नावाजलेला मल्ल म्हणून रामदास तडस यांची ओळख होती.

रामदास तडस यांचा राजकीय प्रवास

विदर्भात एक प्रथितयश मल्ल म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर रामदास तडस राजकारणाकडे वळले. 1983 मध्ये पूलगाव कृषी बाजार उत्पन्न समितीच्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर 1985 मध्ये रामदास तडस यांनी नवी आघाडी स्थापन करुन देवळी नगरपरिषदेची निवडणूक लढवली. यावेळी त्यांनी दिवंगत मोतीलाली कपूर यांचे तब्बल 35 वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आणले. तेव्हापासून देवळी नगरपरिषेदवर कायम रामदास तडस गटाचे वर्चस्व राहिले आहे.

नंतरच्या काळात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून ते विधानपरिषेदवर निवडूनही गेले होते. मात्र, 2009 मध्ये रामदास तडस यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपचे कमळ हातात धरले. त्यानंतर भाजपने त्यांना देवळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली होती. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या रणजित कांबळे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.

अखेर 2014 साली भाजपने त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. या निवडणुकीत मोदी लाटेमुळे रामदास तडस विजयी ठरले. मात्र, 2019 मध्ये रामदास तडस यांच्यासमोर काँग्रेसच्या चारुलता टोकस यांनी तगडे आव्हान निर्माण केले होते. रामदास तडस यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनी वर्ध्यात सभा घेतली होती. तर चारुलता टोकस यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही वर्ध्यात प्रचार केला होता. त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची झाली होती. अखेर या लढतीत रामदास तडस यांनी बाजी मारली होती.

VIDEO :

संबंधित बातम्या  

विदर्भ केसरीचा किताब जिंकणारा मल्ल, राजकारणातील ‘पहिलवान’, कोण आहेत रामदास तडस?