मुंबई: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी मतदान केलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) हे आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah)आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाकडे एकूण 50 आमदार आहेत. 40 आमदार हे शिवसेनेतून बंड करून आले आहेत. प्रत्येकाला मंत्रिपदाची आणि महामंडळांची आशा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बंडखोरांना मंत्रिपदे मिळण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येतं. आजच्या बैठकीत त्यावर चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ वाटपाआधी आज रात्री दिल्लीला रवाना होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाशी या दोन्ही नेत्यांची पुन्हा चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी प्रयत्न सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिंदे गट आणि भाजपमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला तयार झाला आहे. त्यानुसार खाते वाटप होणार आहे. त्यावर अंतिम मंजुरी घेण्यासाठी हे दोन्ही नेते दिल्लीत जात असल्याचं सांगण्यात येतं.
दरम्यान, राष्ट्रपती निवडमुकीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत ट्रायडन्ट हॉटेलमध्ये शिंदे गटातील आमदारांची बैठक सुरु झाली आहे. आज रात्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते सहकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. उद्या भाजपा पक्षश्रेष्ठींशी पुन्हा चर्चा करण्याची शक्यता आहे. 20 तारखेला सुप्रीम कोर्टातही सुनावणी आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे.
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांचं सरकार येऊन 15 दिवस लोटले आहेत. तरीही राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. उलट शिंदे-फडणवीस यांच्याकडून कॅबिनेटची बैठक घेऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यावर विरोधकांनी टीका केली आहे. तुमच्याकडे बहुमत आहे तर मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. या निमित्ताने विरोधकांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधला जात आहे.