मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा! जे पवारांना जमलं नाही ते फडणवीसांनी करुन दाखवलं

| Updated on: Nov 23, 2024 | 4:46 PM

महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने पुन्हा एकदा शंभरचा आकडा गाठला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या १५ वर्षात महाराष्ट्रात जे करुन दाखवलं ते शरद पवार यांना देखील करता आले नाही.

मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा! जे पवारांना जमलं नाही ते फडणवीसांनी करुन दाखवलं
Follow us on

महाराष्ट्राच्या 64 वर्षांच्या राजकीय इतिहासात मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरे नेते आहेत. वसंतराम नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा क्रमांक लागतो. असा करिष्मा शरद पवार हे 4 वेळा मुख्यमंत्री बनल्यानंतर ही करू शकले नाहीत. तब्बल 47 वर्षांनंतर महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्याने आपला संपूर्ण कार्यकाळ पूर्ण केला. इतकंच नाही तर राज्याचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. विधानसभा निवडणुकीत सलग तीन वेळा शतक करणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ही ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवली आहे.

महाराष्ट्रात महायुतीने अभूतपूर्व असा विजय मिळवला आहे. याचा अंदाज यावरूनच लावता येईल की, विरोधी पक्षातील कोणत्याही पक्षाला अधिकृतपणे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतपत जागा मिळलेल्या नाहीत. त्यामुळे भाजप आणि महायुतीच्या विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस पुढे आले आहेत.

2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेने युती करुन विजय मिळवला होता. पण नंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. त्याआधी ऑक्टोबर 2014 ते नोव्हेंबर 2019 या काळात फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखालील युतीच्या विजयानंतर त्यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा स्वाभाविक होता. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याने युती तुटली.

5 वर्षांपूर्वी 23 नोव्हेंबर 2019 रोजी, सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केलं होतं. पण ते जास्त दिवस टिकू शकलं नाही. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राजकीय उलथापालथ झाली. पण नंतर ते पुन्हा महाविकासआघाडीसोबत गेले आणि सरकारमध्ये सहभागी झाले. पण अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर मग अजित पवार यांनी पुन्हा बंड केलं आणि सरकारमध्ये सहभागी झाले.

शिवसेनेतील बंडखोर गटाने भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर सर्वांनाच वाटले की आता फडणवीसच मुख्यमंत्री होतील. कारण तेव्हा दुसरा कोणी दावेदार नव्हता. मात्र भाजपच्या हायकमांडने शिंदे यांना मुख्यमंत्री आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला.  फडणवीस म्हणाले होते की, आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, पण नंतर पक्षाचा आदेश घेऊन ते उपमुख्यमंत्री झाले.

आता महायुतीच्या बाजुने पुन्हा एकदा निकाल लागल्याने पुन्हा तोच प्रश्न आहे की, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नाचे उत्तर काही तासात सापडेल, पण सध्या तरी फडणवीसांनी विधानसभेत ५ वर्षांपूर्वी बोललेले ते प्रसिद्ध शब्द पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत – मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा! फडणवीस यांनी त्यांचे म्हणणे नक्कीच खरे केले आहे.