तुमच्या डोक्यात काय देशाचं नाव बदलायचं सुरू आहे काय ?; उद्धव ठाकरे यांचा भाजपला थेट सवाल
ही लढाई संविधान वाचवायची आहे. बाळासाहेब म्हणायचे, याची सुरुवात कोर्टापासून करा. कोर्टात जो साक्ष द्यायला येतो. तो धर्मग्रंथावर हात ठेवतो. त्याऐवजी संविधान ठेवा अशी मागणी बाळासाहेबांनी केली होती. संविधान वाचले तर देश वाचेल परंतू संविधानच बदलायचे आहे. यांना 400 पार याच कारणासाठी हवे आहे. त्यांचे मंत्री आनंद कुमार हेगडे म्हणाले, आम्हाला संविधान बदलायचे आहे. त्यासाठी 400 पार हवे आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
मुंबई | 17 मार्च 2024 : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा समारोप आज मुंबईत झाला. यावेळी मुंबई दादर येथील शिवाजी पार्क मैदानात इंडीया आघाडीच्या नेत्यांच्या सभा झाल्या. या सभेत शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपावर घणाघाती टीका केली. मुंबईतून देशातील महत्वाच्या चळवळीची मुहुर्तमेढ रोवली गेली. महात्मा गांधी यांनी 42 साली छोडो भारतचा नारा मुंबईतूनच दिला होता. आता भाजपाला तडीपार करण्याचा नारा येथून देशभर गेला पाहीजे, अब की बार भाजपा तडीपार हा माझा नारा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावले.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी देशात जी हुकूमशाही टपलेली आहे, तिला हद्दपार करण्यासाठी तुम्ही शिवाजी पार्क निवडलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो असे सांगितले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की भाजप हा फुगा आहे. या फुग्यात हवा भरण्याचे काम आम्ही केले. संपूर्ण देशात त्यांचे दोन खासदार होते. त्या फुग्यात आम्ही हवा भरली, आता त्यांच्या डोक्यात हवा गेली. त्यांनी ४०० पारचा नारा दिला. काय फर्निचरचं दुकान आहे का? खुर्च्या बनवत आहात का. ४०० पार म्हणजे काय फर्निचरचं दुकान काढत आहात का? खुर्च्या बनवत आहात का ? अशा शब्दात ठाकरे यांनी खिल्ली उडविली.
बाकी परिवार आहे कुठे?
देशात सर्वत्र यांची दहशत आहे. यंत्रणांना हाताशी धरुन पक्ष फोडले जात आहे. ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रात नाही. तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ही परिस्थिती सारखीच आहे. आपण इंडिया आघाडीची बैठक घेतली. तेव्हा मोदी म्हणत होते विरोधकांची बैठक आहे. आम्ही विरोधक आहोत. पण हुकूमशाहीच्या विरोधातले आहोत असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. तुम्ही घराणेशाहीवर आरोप करता. परंतू तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मोदी सरकार नव्हे…भारत सरकार
रशियात निवडणुका सुरू आहेत. पुतीनच्या विरोधात कोणी नाही. कारण तुरुंगात टाकलंय. देशाबाहेर तडीपार केललंय. फक्त निवडणूक घेतल्याचा पुतीन भास करत आहेत. तसंच आपल्या देशात सुरू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. देश वाचला पाहिजे. व्यक्तीची ओळख ही देश असला पाहिजे. कोणी कितीही मोठा असला तरी देश मोठा असला पाहिजे. मोदी म्हणतात ‘मोदी सरकार’ म्हणजे तुमच्या डोक्यात माझ्या देशाचे नाव बदलायचे आहे का. हा भारत आहे. ‘भारत सरकार’च असेल अशा भाषेत उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावले.