मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत युती सरकारमध्ये ते सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील भाजपसोबत जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. पण शरद पवार यांनीही अनेकदा आपण भाजपसोबत जाणार नसल्याचं म्हटलं. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी पक्षातल्या अंतर्गत वादात मला पडायचं नाही. पण शरद पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी कोल्हापुरात सभा घेतली. बेईमानांवर हल्लाबोल केला. तो जबरदस्त होता. मी त्याला महत्त्व देतो. आपण जो संभ्रम निर्माण करत आहात तो चुकीचा आहे, संजय राऊत म्हणाले. शरद पवार हे भारतीय जनता पार्टीबरोबर कधीच जाणार नाहीत, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र ही युद्धाची भूमी आहे. एक मैदानावरचं युद्ध आणि एक गनिमी काव्याने लढलेले युद्ध, अशी दोन युद्धे महाराष्ट्रात लढली गेली. आम्ही मैदानात उतरून युद्ध लढतोय. शरद पवारांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे. तो म्हणजे गनिमी काव्याचा. ते त्यांच्या पक्षातील लोकांशी गनिमी काव्याने लढत आहेत. आम्ही शस्त्र वापरून हे युद्ध लढत आहोत. दोन्ही युद्धात आम्हाला यश येईल.याची खात्री आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर भाष्य केलं.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीतील वादावर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीतील फुटीबाबत आपल्याकडे पत्र आलं नसल्याचं नार्वेकर म्हणालेत. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या भूमिकेकडे आम्ही वेगळ्या नजरेने पाहत आहोत. नार्वेकरांनी फूट पडली नाही, असं म्हटलं आहे. पण दुसरीकडे शिवसेनेच्या बाबतीत मात्र आम्ही फूट पडल्याचं स्पष्टपणे दाखवलं तरी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नार्वेकर कुठलीही भूमिका घेत नाहीत. याला ढोंग म्हणतात, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाल्याचं बोललं जता आहे. त्यावर काल ग्रँड हयातमध्ये आम्ही सर्वांशी चर्चा केली. कुणाच्याही संभ्रम नाही, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.