उस्मानाबादमध्ये कोण जिंकेल? शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची स्टॅम्प पेपरवर पैज
उस्मानाबाद : राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांच्या विजयाचा किती विश्वास असतो हे उस्मानाबाद जिल्ह्यातील राघूचीवाडी येथील घटनेने समोर आले आहे. नेत्यांसाठी काहीही करायला तयार असलेल्या या कार्यकर्त्यांनी थेट 100 रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून पैज लावली आहे. शिवसेनेचे बाजीराव करवर आणि राष्ट्रवादीचे शंकर मोरे असे या पैज लावणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. त्यांची ही पैज सध्या चांगलीच चर्चेत आहे. […]
उस्मानाबाद : राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांच्या विजयाचा किती विश्वास असतो हे उस्मानाबाद जिल्ह्यातील राघूचीवाडी येथील घटनेने समोर आले आहे. नेत्यांसाठी काहीही करायला तयार असलेल्या या कार्यकर्त्यांनी थेट 100 रुपयांच्या स्टॅम्पवर लिहून पैज लावली आहे. शिवसेनेचे बाजीराव करवर आणि राष्ट्रवादीचे शंकर मोरे असे या पैज लावणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे आहेत. त्यांची ही पैज सध्या चांगलीच चर्चेत आहे.
बाजीराव आणि शंकर यांनी उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चक्क स्वतःच्या दुचाकी गाड्यांची पैज लावली. त्यांनी या पैजेचा करारनामा 100 रुपयांच्या स्टॅम्पवर नोटरी करून घेतला आहे. त्यामुळे हे कार्यकर्ते आपल्या दाव्यांवर किती ठाम आहे हेही याचाही प्रत्यय येत आहे. राघूचीवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शंकर मोरे यांनी शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर निवडून आल्यास आपल्या मालकीची दुचाकी शिवसेनेचे कार्यकर्ते बाजीराव करवर यांना देणार असल्याचे करारनाम्यानुसार लिहून दिले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते बाजीराव करवर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील निवडून आल्यास आपल्या मालकीची दुचाकी मोरे यांच्या नावे करणार असल्याचे जाहीर केले.
कोण बाजी जिंकणार आणि कोण हरणार?
बाजीराव करवर हे व्यवसायाने शेतकरी असून दुधाचा व्यवसाय करतात. शंकर मोरे हे खासगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम करतात. दोघांचीही स्थिती तशी जेमतेम असतानाही त्यांनी नेत्यांसाठी स्वतःची संपत्ती आणि प्रतिष्ठा पणाला लावली आहे. करवर आणि मोरे यांनी 20 एप्रिलला 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरीद्वारे करारनामा केला. आता निवडणूक निकालानंतर 23 मे रोजी कोण बाजी जिंकणार आणि कोण हरणार? याबद्दल स्थानिकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.
पैजेच्या ‘बाजीरावा’ची जिल्ह्यात चर्चा
‘शिवसेनेचा बाजीराव आणि राष्ट्रवादीचा शंकर’ यांच्या या निवडणूक निकाल पैजेची गावासह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. राघूचीवाडी हे गाव प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेसोबत राहिले आहे. मोदी लाटेमुळे आपण जिंकू असा करवर यांना विश्वास आहे. आता त्यांना या पैजेनंतर ‘पैजेचा बाजीराव’ असेही म्हटले जाऊ लागले आहे.
‘नेत्यांसाठी काय पण?’
‘नेत्यांसाठी काय पण?’ अशी कार्यकर्त्यांची तयारी असली, तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी याची दखलही घेतलेली नाही. एरव्ही पक्षाचे नेते निवडणुकीत भाषण ठोकतात. मात्र, त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हेवे दावे आणि वाक युद्ध सुरुच राहते. असे असले तरी नेत्यांसाठी झटणारे हे कार्यकर्ते मात्र कायम दुर्लक्षितच राहतात. जाणता राजा आणि मातोश्रीला अशा कार्यकर्त्यांची किंमत कधी कळणार हे आता पाहावे लागेल.