कृष्णकांत साळगावकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, चिपळूण: उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे (shivsena) नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांच्या घरावर हल्ला होऊन तीन दिवस उलटले तरी पोलिसांना या हल्ल्यामागचं कारण उलगडता आलं नाही. राजकीय हेतूने हा हल्ला होता की उपद्रवींनी हा हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, भास्कर जाधव यांच्या घराजवळ पेट्रोलने भरलेली बॉटल सापडली आहे. त्यामुळे सर्वचजण हादरून गेले आहेत. हल्लेखोरांचा नेमका हेतू काय होता? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. पोलिसांनी ही बॉटल ताब्यात घेतली असून पेट्रोल पंपावरचे (petrol pump) सीसीटीव्ही कॅमेरे पाहून हल्लेखोरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व अंगाने तपास सुरू केला आहे. भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जाधव यांच्या घराच्या सुरक्षेत वाढ करतानाच त्यांच्या घरावर फेकण्यात आलेल्या वस्तुही ताब्यात घेऊन त्यानुषंगाने तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी जाधव यांच्या घरावरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी डॉग स्क्वॉडची मदत घेतली आहे. डॉग स्क्वॉड जाधव यांच्या घराच्या परिसरात आले. त्यानंतर अवघ्या 50 मीटरवरच हे श्वान घुटमळत राहिले. त्यामुळे पोलिसांना तपासात आव्हान निर्माण झालं आहे.
सध्या पोलिसांकडून जाधव यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य कुठून आले याचा तपास सुरू आहे. जाधव यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही बंद आहेत. मात्र, 200 मीटर परिसरात असणारे सीसीटीव्ही फिड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे सीसीटीव्ही पाहून हल्लेखोरांचा तपास करण्यात येत आहे.
जाधव यांच्या घरासमोर पेट्रोलने भरलेली बॉटल सापडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पेट्रोलने भरलेली बॉटल आणण्यामागचा हल्लेखोरांचा हेतू काय होता? ही बॉटल कशासाठी आणली याचाही तपास करण्यात येत आहे. तसेच आसपासच्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, जाधव यांच्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या आठही संशयितांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. मात्र, यापैकी एकालाही अटक करण्यात आलेली नाही.