शिवसेना, राष्ट्रवादीचे लोक असेच भाजपमध्ये गेले नाहीत, एका शक्तीने त्यांचा गळा…; राहुल गांधी यांचा हल्लाबोल
मोदी केवळ मास्क आहेत. मुखवटा आहेत. बॉलिवूडच्या ॲक्टर्सना जसा रोल दिला जातो. आज हे बोलायचं, उद्या ते बोलायचं. सकाळी समुद्राखाली जा, सी प्लेनमधून उडा. काही 56 इंचाची छाती नाही. खोकला व्यक्ती आहे अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
मुंबई | 17 मार्च 2024 : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा समारोप मुंबईत झाला. यावेळी दादरच्या शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची सभा झाली. या सभेत संबोधित करताना राहुल गांधी यांनी आपल्या ‘भारत जोडो’ यात्रा का काढावी लागली याची कारणमीमांसा केली. जनतेचे मुद्दे वेगळे आहेत सोशल मिडीयात किंवा टीव्ही मिडीयात ते दाखविले जात नाहीत. तुम्ही त्यावर जाऊ नका. त्यावर कंट्रोल आहे. अमेरिकेच्या कंपन्यांचा सोशल मिडीयावर दबाव आहे. जनतेचे मुद्दे वेगळे आहेत, बेरोजगारी, हिंसा द्वेष, महागाई, शेतकऱ्यांचे मुद्दे, जवानांचे मुद्दे, अग्निवीरचे मुद्दे हे मुद्दे तुम्हाला मीडियात दिसणार नाहीत. त्यामुळे आम्हाला ही यात्रा करावी लागली. कारण काहीच पर्याय नव्हता असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.
आम्ही भाजपविरोधात लढत आहोत. आम्ही सर्व एका राजकीय पक्षाविरोधात लढतोय असं लोकांना वाटतं. देशालाही तसंच वाटत. पण ते सत्य नाही. आम्ही राजकीय पक्षाविरोधात लढत नाही. देशातील तरुणांनी ही गोष्ट समजून घ्यावी. काहींना वाटतं एका व्यक्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढत आहोत. नाही. आम्ही भाजपच्या विरोधात लढत नाही. एका व्यक्तीच्या विरोधात लढत नाही. एका व्यक्तीला चेहरा बनवून बसवलं आहे. हिंदू धर्मात शक्ती शब्द असतो. आम्ही शक्तीच्या विरोधात लढत आहोत. एका शक्तीच्या विरोधात लढत आहोत असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.
त्यांना गळा पकडून नेले
आता ती शक्ती काय आहे हा सवाल आहे. कुणी तरी म्हणालं, राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. बरोबर आहे. राजाचा आत्मा ईव्हीएममध्येच आहे. भारताच्या प्रत्येक संस्थेत आहे. ईडीत, आयटी, सीबीआयमध्ये आहे. या राज्यातील एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेस पक्षाला सोडले. आणि तो माझ्या आईला रडत म्हणाला, सोनियाजी, मला लाज वाटतेय माझ्यात या लोकांशी लढण्याची हिंमत नाही. या शक्तीशी लढायचं नाही. मला तुरुंगात जायचं नाही. एक नाही असे हजारो लोक घाबरवलेले आहेत असे राहुल यांनी आपल्या भाषणात सांगितले. ते पुढे म्हणाले की शिवसेना, एनसीपीचे लोक असेच गेलेत का?, तुम्हाला काय वाटतं? नाही त्या शक्तीने या लोकांचा गळा पकडून त्यांना भाजपमध्ये नेलं. ते सर्व घाबरून गेलेत असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.