मुंबई : एकीकडे (Shivsena) शिवसेनेतून शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या दिवसागणिस वाढत आहे. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख यांच्या पाठोपाठ आता पदाधिकारी देखील पक्षाला जय महाराष्ट्र करीत आहेत. असे असतानाच दुसरीकडे पक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही हेच शिवसेनेने दाखवून दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षापासून दुरावलेले (Ramdas Kadam) रामदास कदम आणि (Anandrao Adsul) आनंदराव अडसूळ यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. रामदास कदम यांच्या मुलाने यापूर्वीच शिंदे गटात सहभाग नोंदवला आहे. शिवाय रामदास कदम यांनीही पक्ष विरोधात भूमिका घेतल्याचे कारण पुढे करीत पक्षाने ही कारवाई केली आहे. शिवसेना पक्षाकडून ही कारवाई केली असली तरी दुसरीकडे शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या ही वाढतच आहे.
रामदास कदम यांची ओळख एक कट्टर शिवसैनिक अशीच होती. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांनीच त्यांना शिवसेने नेतेपद दिले होते. मात्र, शिवसेनेची सत्ता असताना देखील ते पक्षापासून दुरावलेले होते. शिवाय अनिल परब आणि त्यांच्यातील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले होते. असे असताना आपण शिवसेना पक्ष सोडणार नाही अशी भूमिका त्यांनी मध्यंतरी घेतली होती. पण त्यांनी पक्षाविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांना अखेर पक्षातून काढण्यात आले आहे. तशी अधिकृत पक्षाने घोषणा केली आहे. ही पक्षाकडून केलेली कारवाई असली तरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची संख्या ही घटत आहे.
शिवसेनेमध्ये पूर्वीसारखे वातावरण राहिले नाही. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाहीतर अनेकांचा पक्षामध्ये हस्तक्षेप वाढत आहे. त्यामुळे आपण शिवसेना नेते पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत रामदास कदामांनी स्पष्ट केले आहे. शिवाय महाविकास आघाडी बरोबर जाऊ नका असेही आपण शिवसेना पक्षप्रमुखांना अनेक वेळा सांगितले होते असेही कदम म्हणाले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नेतेही आता सेनेपासून दुरावत असल्याचे चित्र आहे.
शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली नसली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याशी बोलणार आहेत. शिवाय यापूर्वीच कदम यांचा मुलगा शिंदे गटात सहभागी झाल्याने वाट पडली असून त्याच वाटेवर कदमही जाणार का हे पहावे लागणार आहे.