आयपीएल मेगा ऑक्शन 2025 चं काउंटडाउन सुरु झालं आहे. मेगा ऑक्शन सुरु होण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. मेगा ऑक्शन 23 आणि 24 नोव्हेंबरला सौदी अरेबिया येथील जेद्दाह शहरात होणार आहे. मेगा ऑक्शनला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मेगा ऑक्शन लाईव्ह मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल. तर टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर मेगा ऑक्शन पाहता येईल.
आयपीएल मेगा ऑक्शन 2025 आधी सर्व 10 फ्रँचायजींनी त्यांच्या रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. त्यापैकी केकेआर, दिल्ली कॅपिट्ल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या 3 संघांनी खेळाडूंसह कर्णधारांनाही करारमुक्त केलं. त्यामुळे ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे 3 माजी कर्णधार मेगा ऑक्शनमध्ये त्यांचं भाग्य आजमवणार आहेत. या मेगा ऑक्शनसाठीच्या 2 मॉर्की लिस्टमध्ये प्रत्येकी 6-6 खेळाडूंची नावं आहेत. पहिल्या यादीत ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, जोस बटलर, अर्शदीप सिंह, कगिसो रबाडा आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या यादीत केएल राहुल, युझवेंद्र चहल, लियाम लिविंगस्टोन, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांची नावं आहेत.
या मेगा ऑक्शनसाठी 1 हजार 577 मधून फक्त 577 खेळाडूंची निवड करण्यात आली आहेत. या 577 जणांमध्ये 367 भारतीय तर 210 परदेशी खेळाडू आहेत. तर एकूण 10 संघांना फक्त 204 खेळाडूंची गरज आहे. अशात आता 577 मधून कोणते 204 खेळाडू भाग्यवान ठरतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
नेहमीप्रमाणे यंदाही 2 कोटी ही सर्वाधिक बेस प्राईज आहे. या ऑक्शनमध्ये 81 खेळाडूंनी त्यांची बेस प्राईज ही 2 कोटी निश्चित केली आहे. तर यंदा किमान बेस प्राईज ही 30 लाख रुपये आहे. याआधी बेस प्राईज 20 लाख रुपये होती.
ऑक्शनमध्ये स्टार खेळाडूंवर लक्ष असणार आहेत. या ऑक्शनमध्ये अनेक स्टार खेळाडू आहेत. मात्र त्यातही निवडक असे 12 खेळाडू आहेत. या 12 खेळाडूंना 6-6 च्या 2 मॉर्की प्लेअर लिस्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. या मॉर्की प्लेअर लिस्टमधील खेळाडूंपासून ऑक्शनला सुरुवात होणार आहे. त्यानंतर कॅप्ड खेळाडूंच्या पहिल्या फेरीला सुरुवात होईल. या कॅप्ड खेळाडूंना फलंदाज, वेगवान गोलंदाज, विकेटकीपर, स्पिनर आणि ऑलराउंडर यानुसार विभागण्यात आलं आहे.
आता या मेगा ऑक्शनमधील 577 खेळाडूंमधील प्रत्येकाचं नाव घेतलं जाणार नाही. या 577 पैकी 117 खेळाडूंचीच एक एक करुन नावं घेतली जाणार आहेत. त्यांनतर 118 व्या खेळाडूपासून एक्सीलेरेशन राउंडला सुरुवात होईल. आयपीएलकडून आधी 574 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यानंतर अचानक जोफ्रा आर्चर याच्यासह 3 खेळाडूंची नावं जोडली गेली.
दरम्यान मेगा ऑक्शनसाठी प्रत्येक संघाला 120 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं निश्चित झालं होतं. मात्र रिटेन्शनमध्ये 10 पैकी काही संघांनी काही खेळाडूंना रिटेन केलं होतं. त्यामुळे रिटेन्शनंतर कोणत्या संघाकडे ऑक्शनसाठी किती रक्कम बाकी आहे? हे जाणून घेऊयात.