मुंबई : सूर्यकुमार यादव T20 मध्ये स्टार आहे. टी 20 मध्ये त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. टी 20 मध्ये त्याला मिस्टर 360 म्हटलं जातं. पण सूर्यकुमारला तसाच फॉर्म वनडेमध्ये दाखवता आलेला नाही. सूर्यकुमार टी 20 मध्ये जसा खेळतो, त्याचीच पुनरावृत्ती वनडेमध्ये पहायला मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण अजूनपर्यंत असं झालेलं नाही. टीम इंडियासाठी हाच चिंतेचा विषय आहे. वनडेचा फॉर्म नसूनही सूर्यकुमारला सातत्याने वनडेमध्ये संधी मिळते.
सूर्यकुमारला ही संधी का मिळते? त्यावर आता कॅप्टन रोहित शर्माने उत्तर दिलं आहे. यंदा वनडे वर्ल्ड कप भारतात होतोय. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. टीमचे मधल्याफळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि केएल राहुल सध्या दुखापतग्रस्त आहेत.
म्हणून सूर्याला संधी मिळतेय?
दोघे पुनरागमनाचा प्रयत्न करतायत. त्यामुळेच सूर्यकुमार यादवला वनडेमध्ये संधी मिळतेय. पण तो फेल होतोय. टीम मॅनेजमेंट सूर्यकुमारवर विश्वास दाखून वारंवार संधी देत आहे. वनडे वर्ल्ड कपच्या टीमसाठी तो सुद्धा स्पर्धेत आहे.
वनडेमध्ये सुधारणेसाठी सूर्या काय करतोय?
“सूर्यकुमार आपल्या खेळात सुधारणा घडवण्यासाठी बरीच मेहनत घेतोय. सूर्यकुमार आपल्या वनडे क्रिकेटमधील खेळात सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक माजी क्रिकेटपटूंशी चर्चा करतोय. ज्यांनी बरच वनडे क्रिकेट खेळलय, त्यांच्याशी सूर्या बोलतोय” असं रोहितने एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
सूर्यकुमारला का संधी दिली पाहिजे?
“सूर्यकुमार यादव एक शानदार फलंदाज आहे. त्यांच्यासारख्या फलंदाजाला एक्स्ट्रा मॅच मिळाली पाहिजे. जेणेकरुन त्याला आत्मविश्वास मिळेल” असं रोहित म्हणाला. “सूर्यकुमारसाठी यावर्षीच्या आयपीएलची चांगली सुरुवात झाली नव्हती. पण त्याने पुनरागमन केलं, त्यानंतर त्याने जे केलं, ते सर्वांना पाहिलं” असं रोहित म्हणाला.
टीम इंडियाने आपला शेवटचा वनडे वर्ल्ड कप 2011 मध्ये जिंकला होता. त्यावेळी सुद्धा भारतातच ही स्पर्धा झाली होती. त्यानंतर 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला. त्यानंतर टीम इंडिया आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेली नाही. 2015 आणि 2019 मध्ये टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कपची सेमीफायनल गाठली होती.