ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत प्लेइंग 11 मधून राहुल द्रविडच्या मुलाला का वगळलं? झालं असं की..

| Updated on: Sep 26, 2024 | 9:18 PM

भारताच्या अंडर 19 संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळला. या संघात राहुल द्रविडच्या मुलाची निवड झाली होती. पण तिन्ही सामन्यात त्याला बेंचवर बसवलं गेलं. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 मध्ये न घेण्याचं कारण तरी काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत प्लेइंग 11 मधून राहुल द्रविडच्या मुलाला का वगळलं? झालं असं की..
Image Credit source: PTI
Follow us on

समित द्रविडने वडील राहुल द्रविड यांच्या पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटचे धडे गिरवले. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. समित द्रविडने कूच बिहार स्पर्धेत आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. समितला कर्नाटकच्या महाराजा ट्रॉफी टी20 लीग स्पर्धेतही खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याची निवड भारताच्या अंडर 19 संघात झाली. वनडे आणि चार दिवसीय मालिकेसाठी त्याची निवड केली आहे. त्यामुळे समित द्रविड अंडर 19 भारतीय संघात डेब्यू करेल तसेच आपल्या कामगिरीची छाप सोडेल असं वाटलं होतं. पण तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याला प्लेइंग 11 मधून डावलण्यात आलं. त्यामुळे उलटसूलट चर्चांना उधाण आलं आहे. पण आता खरं कारण समोर आल्याने चर्चांना पूर्णविराम लागला आहे. त्याचं संघात न खेळण्याचं प्रमुख कारण दुखापत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, समितला दुखापत झाली आहे. त्यामुळेच तो एकही सामन्यात खेळला नाही. पण त्याच्या दुखापतीबाबत जास्त काही माहिती नाही.

रिपोर्टनुसार, समित नॅशनल क्रिकेट अकादमीत पुनरागमनासाठी उपचार घेत आहे. 30 सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार दिवसीय मालिका सुरु होणार आहे. समित या संघाचा भाग असून दुखापतीतून सावरला तर खेळताना दिसू शकतो. समित द्रविडसाठी हा शेवटचा अंडर 19 सामना असेल. कारण नोव्हेंबर महिन्यात समित 20 वर्षांचा होणार आहे. दुसरीकडे, अंडर 19 संघात समितची निवड झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. कारण महाराजा ट्रॉफीत त्याची कामगिरी निराशाजनक होती. 10 पैकी 7 सामन्यात खेळला पण त्याला एकूण 82 धावा करता आल्या. 33 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. दुसरीकडे, अंडर 19 देशांतर्गत कूच बिहार स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेच्या 8 सामन्यात 362 धावा केल्या होत्या. तसेच 16 विकेटही घेतल्या होत्या.

दरम्यान, भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाला 3-0 ने क्लिन स्विप दिला. तसेच एक नवा विक्रम रचला आहे. पहिल्या वनडेत 5 विकेटने पराभूत केलं. दुसर्‍या वनडे 9 विकेटने पराभूत केलं. तर शेवटच्या तिसऱ्या वनडेत 7 धावांनी पराभूत केलं. आता भारतीय संघ 30 सप्टेंबरपासून चार दिवसीय कसोटी खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 30 सप्टेंबर, तर दुसरा कसोटी सामना 7 ऑक्टोबरला होणार आहे.