डोमिनिका | टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशीच विजय मिळवला आहे. टीम इंडियाने विंडिजचा एक डाव आणि 141 धावांनी धुव्वा उडवला आहे. डेब्युटंट यशस्वी जयस्वाल आणि अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विन हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले. आर अश्विन याने संपूर्ण सामन्यात एकूण 12 विकेट्स घेतल्या. तर यशस्वी जयस्वाल याने 171 धावांची धमाकेदार खेळी केली. टीम इंडियाने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी पहिला डाव 421 धावांवर घोषित केला. त्यानंतक टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात 130 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाकडून आर अश्विन याने दुसऱ्या डावात सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाची विजयी सुरुवात
India demolished West Indies by an innings and 141 runs at Dominica to go 1-0 up in the Test series ?#RaviAshwin #India #WIvsIND #Cricket #RavindraJadeja #Tests pic.twitter.com/rXVFWxcYEQ
— Wisden India (@WisdenIndia) July 14, 2023
विंडिजने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. विंडिजचा पहिला डाव 150 धावांवर आटोपला. अश्विनने टीम इंडियाकडून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी टीम इंडियाला अफलातून सुरुवात करुन दिली. या दोघांनी 227 धावांची विक्रमी सलामी भागीदारी करुन दिली. यशस्वीने 171 धावांची ऐतिहासिक खेळी केली. कॅप्टन रोहितने 103 धावा करत विंडिज विरुद्ध दुसरं कसोटी शतक ठोकलं. विराट 76 धावांवर बाद झाला. तर रविंद्र जडेजा 37 रन्स करुन नाबाद परतला. टीम इंडियाने पहिला डाव 421 धावांवर घोषित केला. त्यामुळे 271 धावांची आघाडी मिळाली.
फलंदाजांनी काम केल्यानंतर आता गोलंदाजांची वेळ होती. कॅप्टन रोहित शर्माने जवळपास तिसऱ्या दिवसातील 50 ओव्हर्सचा खेळ बाकी असताना इनिंग डिक्लेअर केली. त्यानंतर अश्विनने विंडिजला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवलं. विंडिजला 130 धावांवर ऑलआऊट केलं. अश्विनने या सामन्यात सलग दुसऱ्यांदा आणि एकूण 34 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच एकाच सामन्यात 10 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची अश्विनची आठवी वेळ ठरली. अश्विनने यासह माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्या विक्रमाची बरोबरी केली. दरम्यान टीम इंडियाच्या विजयानंतर यशस्वी जयस्वाल याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.