डोमिनिका | कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने वेस्ट इंडिज दौऱ्याची विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर तिसऱ्याच दिवशी पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 141 धावांनी मोठा विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विंडिजला पहिल्या डावात 150 धावांवर ऑलआऊट करुन टीम इंडियाने 421 धावांवंर डाव घोषित केला. टीम इंडियाला 271 धावांची मोठी आघाडी मिळाली. मात्र आर अश्विन याने दुसऱ्या डावात विंडिजचा अवघ्या 130 धावांवर बाजार उठवला. टीम इंडियासाठी या विजयानंतर मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.
विंडिज विरुद्धच्या या कसोटी मालिकेतून टीम इंडियाने आपल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 साखळी फेरीचा श्रीगणेशा केला. टीम इंडियाने आपल्या या फेरीतील पहिल्याच सामन्यात विजय मिळवून धमाकेदार सुरुवात केली. टीम इंडिया विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2023-25 पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अव्वल स्थानी पोहचली आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघानी एशेज सीरिजद्वारे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 मोहिमेची सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने सलग 2 सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी होती. मात्र तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्याचा परिणाम हा ऑस्ट्रेलियाच्या विजयी टक्केवारीवर झाला.
आतापर्यंत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज या 4 टीमनेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 साखळी फेरीतील सामने खेळले आहेत. या पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडिया पहिल्या, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या आणि विंडिज चौथ्या स्थानावर आहे.
दरम्यान विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा आणि शेवटचा सामना हा 20 ते 24 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. तर एशेस सीरिजमधील चौथा कसोटी सामना हा 19 ते 23 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन | क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनरिन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच आणि जोमे वॉरिकन.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार) , यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, रविंद्र जडेजा, इशान किशन, आर अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट आणि मोहम्मद सिराज.