मुंबई | 20 जानेवारी 2024 : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्या लग्नाच्या फोटोमुळे संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला असून त्याने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले. शोएब मलिक आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या, मात्र त्या बद्दल त्या दोघांनीही अधिकृत घोषणा केली नाही की कोणतीही प्रतिक्रिया देखील दिली नाही. या चर्चांदरम्यान आता अचानक शोएबच्या लग्नाचे फोटो समोर आल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
सानिया मिर्झाने 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले. शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्यात सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या जवळपास वर्षभरापासून येत होत्या. शनिवारी शोएब मलिकने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली ज्यामध्ये या दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही आणि आता त्यांचे नातेही संपले असल्याचे स्पष्ट केले. त्याच्या लग्नाच्या फोटोंमुळे शोएब आणि सानिया यांचं नातं संपल्याची अधिकृत पुष्टी झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या दोघांचा घटस्फोट झाला आहे. त्यांचं 13 वर्षांचं नातं तुटलं. मात्र सानियाचं नातं तुटण्याची ही पहिलीच वेळ नाही. शोएबशी लग्न करण्यापूर्वी सानियाने तिच्या बालपणीच्या मित्राशी साखरपुडा केला होता, पण त्यानंतर त्यांचं नातं तुटलं.
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न करण्यापूर्वी सानियाने तिचा बालपणीचा मित्र शोहराब मिर्झासोबत एंगेजमेंट केली होती, मात्र लग्नाआधीच त्यांचे नातं तुटले. त्यानंतर सानिया आणि शोएब मलिकची प्रेमकहाणी फुलली आणि दोघांनी 2010 मध्ये लग्न केले.
या कारणामुळे तुटला सानियाचा साखरपुडा
शोहराब आणि सानिया लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. दोघांचे कुटुंब तीन पिढ्यांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शोहराबने सांगितले होते की, मी आणि सानियाने स्वेच्छेने एकमेकांशी साखरपुडा केला होता आणि वेगळं होण्याचा निर्णयही स्वतःच्या इच्छेनेच घेतला होता. आमचा साखरपुडा झाला, पण आम्ही एकमेकांसाठी योग्य नाहीयोत, असं आम्हाला दोघांनाही वाटलं आणि म्हणूनच त्यांनी ठरलेलं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. साखरपुडा झाल्यानंतरच दोघांच्या नात्यामध्ये समस्या निर्माण झाल्या होत्या. साखरपुडा तोडण्याचा निर्णय अचानक घेतला नव्हता, पण हे कधी ना कधी होणारच हे त्यांना माहीत होतं, असंही शोहराबने नमूद केलं.
बराच गदारोळ झाला
सानिया त्यावेळी तिच्या खेळामुळे बरीच चर्चेत आली होती. तिचं नाव नेहमीच चर्चेत असायचं. सानिया आणि शोहराबची एंगेजमेंट तुटल्याची बातमी येताच देशभरात खळबळ उडाली. त्यानंतर सानिया आणि शोएब मलिकच्या प्रेमकथेची बातमी समोर आली. शोएब मलिक सानियाच्या घरी गेल्याचाही फोटो समोर आला होता. त्यांच्या अफेअरची बरीच चर्चा रंगली आणि त्यानंतर दोघांनी 2010 मध्ये लग्न केले. दोघांना एक मुलगा देखील आहे ज्याचे नाव इझान आहे.
मात्र आता त्यांच हे नातंही मोडलं आहे. 13 वर्षांनी त्यांचं हे लग्न तुटलं आणि शोएबने आता पुन्हा नवी लग्नगाठ बांधली आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी त्यान निकाह केला.