न्यूयॉर्क : ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’ ही कविता आपण ऐकली असलेच. आपल्या जोडीदाराच्या भल्यासाठी प्रेमात पडलेली व्यक्ती काहीही करु शकते. अगदी मग त्यासाठी आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीचा त्याग करायचा असेल तर प्रेमात ती व्यक्ती ते देखील करु शकते. कारण त्या व्यक्तीच्या प्रेमात तितकी ताकद असते. तुम्ही ‘हम दिल दे चुके सनम’ असा हिंदी चित्रपट तर पाहिलाच असेल. या चित्रपटात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण काही कारणास्तव ऐश्वर्याचं लग्न हे सलमान खान सोबत न होता अजय देवगन सोबत होतं. पण त्यांच्या लग्नानंतर ऐश्वर्याचा पती अजयला त्यांच्या लग्नाअगोदरच्या प्रेम प्रकरणाविषयी माहिती मिळते. त्यानंतर अजय देवगन ऐश्वर्या आणि सलमानला एकत्र करण्यासाठी इटलीला घेऊन जातो. खरंतर ही चित्रपटातील कहाणी आहे. पण याच कहाणीशी मिळती-जुळती खरी प्रेमकथा सध्या जगभरात चर्चेचा विषय बनली आहे.
या प्रेमकथेतील पती हा आपल्या पत्नीला दुसऱ्या प्रियकर शोधून देतो आणि त्यांचं लग्न लाऊन देतो. वास्तविक पाहता ही कहाणी चित्रपटापेक्षा थोडीशी वेगळी आहे. पण पूर्ण घटना जाणून घेतल्यानंतर संपूर्ण जग महिलेच्या पतीचं कौतुक करत आहेत.
संबंधित घटना ही अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील आहे. एका पतीने आपल्या पत्नीसाठी नवा पती शोधण्यात मदत केली. संबंधित महिलेनं नुकतंच आपलं आत्मचरित्र लिहिलं आहे. त्यामध्ये तिने याबाबत उल्लेख केला आहे. या पुस्तकात तिने आपल्या आयुष्यात नव्या पतीची एन्ट्री नेमकी कशी झाली? याबाबत खुलासा केला आहे.
खरंतर महिलेचा पहिला पती हा गंभीर आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तो जास्त वेळ जगू शकणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. याबाबत जेव्हा महिलेला माहिती मिळाली तेव्हा ती खूप दु:खी झाली. या दरम्यान तिच्या पतीने तिला आपण फार काळ जगू शकणार नाही. त्यामुळे तू स्वत:साठी नवा जोडीदार शोध, असं स्पष्ट सांगितलं.
सुरुवातीला महिलेला आपल्या पतीचं म्हणणं पटलं नाही. आपला पती चुकीचा विचार करत आहे, असं तिला वाटत होतं. पण पतीने तिची वारंवार समजूत घातल्यानंतर ती दुसरं लग्न करण्यासाठी तयार झाली. महिलेच्या पहिल्या पतीने तिच्यासाठी दुसरा जोडीदार शोधला. त्यानंतर काही दिवसांनी त्या व्यक्तीचं निधन झालं. महिलेने आपल्या पुस्तकात या आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे हे पुस्तक सध्या चर्चेत आलं आहे.