मंत्री होताच हसन मुश्रीफ यांचं मोठं वक्तव्य; “शरद पवार हेच आमचे विठ्ठल, पण ‘ते’ डोक्यातून काढून टाका”
त्यावेळी कोल्हापूरमधील शरद पवार यांचे कट्टर कार्यकर्ते असणारे आमदार हसन मुश्रीफ हे देखील अजित पवार यांच्याबरोबर गेले आणि मंत्री झाले.
कोल्हापूर : अजित पवार यांच्या बंडखोरीत शरद पवार यांचे अनेक कट्टर कार्यकर्ते आणि नेते होते. त्यावेळी कोल्हापूरमधील शरद पवार यांचे कट्टर कार्यकर्ते असणारे आमदार हसन मुश्रीफ हे देखील अजित पवार यांच्याबरोबर गेले आणि मंत्री झाले. यावेळी ते फक्त ईडीच्या चौकशीला घाबरून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेले. भाजपमध्ये गेले अशी टीका जिल्ह्याती सामान्य कार्यकर्त्याकडून होत होती. त्यानंतर आता मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये आपण ईडीच्या भीतीने सत्तेत गेलो हे डोक्यातून काढून टाका असे म्हणत आपल्याला ईडीच्या कारवाईत न्यायालयाने मला दिलासा दिल्याचे म्हटलं आहे. तर यावेळी त्यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला कुठे विरोध केला नाही. आपण केवळ राज्याच्या विकासासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी अजित पवारांना साथ देण्याचे ठरवले. तर शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत आणि विठ्ठलच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटावर टीका करू नका, त्यांचे काम त्यांना करू द्या. आपण आपले काम प्रामाणिकपणे पार पाडा, असेही ते म्हणाले आहेत.